सुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:10 IST2020-02-08T16:08:11+5:302020-02-08T16:10:21+5:30

अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, आदी प्रकारांना चाप बसविण्यासाठी गृह विभागाने राज्यात वेगमर्यादा ओलांडणारी वाहने शोधण्यासाठी दिलेल्या स्पीडगन व्हॅनद्वारे शहर वाहतूक शाखेने मागील दोन महिन्यांत २१०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करीत २१ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईच्या बडग्यामुळे वाहनधारकांच्या वेगमर्यादेवरही चाप लावण्यात या शाखेला यश आले आहे.

A fine of Rs | सुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूल

सुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूल

ठळक मुद्देसुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूलवाहतूक शाखेची मोहीम : स्पीडगनमुळे कारवाईस ‘स्पीड’

सचिन भोसले 

कोल्हापूर : अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, आदी प्रकारांना चाप बसविण्यासाठी गृह विभागाने राज्यात वेगमर्यादा ओलांडणारी वाहने शोधण्यासाठी दिलेल्या स्पीडगन व्हॅनद्वारे शहर वाहतूक शाखेने मागील दोन महिन्यांत २१०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करीत २१ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईच्या बडग्यामुळे वाहनधारकांच्या वेगमर्यादेवरही चाप लावण्यात या शाखेला यश आले आहे.

रस्ते अपघातात गंभीर जखमी व मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवून प्रत्येक वाहनचालकाचा सुरक्षित प्रवास होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत.

याच धर्तीवर आॅक्टोबर २०१९ मध्ये राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील प्रत्येक शहरामध्ये स्पीडगन व्हॅन तैनात केल्या आहेत. यातील एक व्हॅन कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडेही दिली आहे.

चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांची लेसर किरणांद्वारे टिंट तपासणी करणारे मीटर, वेगतपासणी करणारी ‘व्हिडिओ बेस्ड लेसर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम’, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांच्या बोलण्यावरून ते मद्यप्राशन करून वाहन चालवीत आहेत का, याचीही पाहणी या यंत्राद्वारे केली जात आहे.

ही सर्व यंत्रणा या एकाच वाहनात आहे. त्या वाहनांद्वारे डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० या दोन महिन्यांत २११५ जणांवर कारवाई करण्यात आली. या स्पीडगन वाहनामुळे वेगमर्यादा न सांभाळणाऱ्या वाहनधारकांना काही प्रमाणात जरब बसली आहे.

प्रत्येकी एक हजाराचा दंड

शहरातील विविध रस्ते, जसे की दुभाजक असलेले रस्ते, चिंचोळे रस्ते, अधिक रहदारीचे रस्ते अशा वर्गीकरणानुसार प्रतितास ४०, ६० आणि ७० किलोमीटर अशी वेगमर्यादा दुचाकी, चारचाकी वाहनांकरिता निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार त्या वाहनाचा वेगही या यंत्रात नोंदविला जात आहे. या वाहनधारकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक शाखेतर्फेही सुसाट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे; परंतु कोल्हापुरात कुठेच कोणत्या रस्त्यावर प्रतिताशी किती वेगाने वाहने चालवावे, याच्या सूचना लावलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालक त्याबाबत अनभिज्ञ असतात; परंतु तरीही दंडवसुली केली जाते.

स्पीडगन व्हॅनद्वारे बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांना नक्कीच चाप बसला आहे. लोकांनी दंड भरण्यापेक्षा सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य द्यावे, असाच आमचा प्रयत्न आहे.
- वसंत बाबर,
पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर

 

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.