लिंकिंग सक्ती केल्यास खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करा - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:05 IST2025-08-19T19:04:36+5:302025-08-19T19:05:02+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना

लिंकिंग सक्ती केल्यास खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करा - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : ऊस व इतर पिकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात युरिया, डीएपी व इतर खतांची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांची गरज वाढल्याने या खतांसोबत लिंकिंग स्वरूपात अन्य कोणतेही खत अथवा मागणीव्यतिरिक्त इतर कोणत्याही निविष्ठांचे लिंकिंग आढळल्यास विक्रेता व खत उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मंत्रीहसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिल्या. लिंकिंगविरहित खताचा पुरवठा होत असल्याची खात्री कृषी विभागाने करावी. लिंकिंगसह खताचा तुटवडा असल्यास कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता नजीर नाईकवडी, कागल-राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तसेच अन्य संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले की, मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या मागील बाजूला असलेल्या सांडव्यावर पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. उत्तूर मध्ये क्रीडांगणासाठी गायरानातील ५ एकर जागा देण्याबाबत तहसीलदारांनी कार्यवाही करावी. युरिया व डीएपी संरक्षित साठा वितरण झाल्याप्रमाणे दोन्ही खतांची उचल होऊन ही खते शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्याची तपासणी करा.
जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुक
मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या लोकार्पण सोहळ्याला विविध भागांतून न्यायमूर्ती, न्यायाधीश, वकील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा सोहळा नियोजनबद्ध व भव्य पद्धतीने पार पडला, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांचे कौतुक केले.