कोल्हापुरातील गुंड चिन्या हळदकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:04 IST2025-10-14T12:04:27+5:302025-10-14T12:04:49+5:30
दौलतनगर परिसरातील टोळीयुद्धाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान

कोल्हापुरातील गुंड चिन्या हळदकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांवर गुन्हा
कोल्हापूर : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चिन्या ऊर्फ संदीप हळदकर याच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रकार रविवारी (दि. १२) रात्री बागल चौक परिसरातील नारायण बाग येथे घडला. चौघांनी केलेल्या हल्ल्यात संदीप बाळू खोत (वय ३२, रा. दौलतनगर, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामा कुऱ्हाडे, अमित दिंडे, चैतन्य दिंडे आणि करण सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
यादवनगर येथील सराईत गुंड आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चिन्या हळदकर याचा सप्टेंबर २०२२ मध्ये यादवनगरात निर्घृण खून झाला होता. दौलतनगर परिसरातील काही तरुण हळदकर याला दगडाने ठेचून पळून गेले होते. त्या घटनेपासून हळदकर टोळीतील गुंड दौलतनगरातील हल्लेखोरांवर डौख धरून होते.
दौलतनगरातील संदीप खोत याच्यासोबत वावरणाऱ्या काही तरुणांवर हल्लेखोरांचा राग होता. यातून त्यांनी रविवारी रात्री संदीप खोत याला फोन करून नारायण बाग येथे बोलावून घेतले. त्यानंतर रामा कुऱ्हाडे आणि इतरांनी एडक्यासह धारदार हत्याराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून पलायन केले. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यादवनगर, दौलतनगर परिसरातील टोळीयुद्धाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
हल्लेखोर सराईत गुन्हेगार
संदीप खोत याच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अमित दिंडे याच्यावर दोन, चैतन्य दिंडे याच्यावर चार, तर करण सावंत याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी चारही हल्लेखोरांना रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.