ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक; कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा येण्याच्या मार्गावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:39 IST2025-11-06T14:38:18+5:302025-11-06T14:39:01+5:30
‘स्वाभिमानी’चेच कार्यकर्ते असल्याचे शेट्टी यांची कबुली

ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक; कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा येण्याच्या मार्गावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चालले आहे. बुधवारी मुख्यमंत्री कोल्हापुरातील कार्यक्रम करून उजळाईवाडी विमानतळाकडे जाताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा जाण्याच्या मार्गावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली.
ऊस दरावरून ‘स्वाभिमानी’सह जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत ऊस दराची कोंडी फोडावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नसल्याने बुधवारच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गनिमी काव्याने उत्तर देऊ, असा इशारा ‘स्वाभिमानी’ नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यामुळे मंगळवारपासूनच पोलिस यंत्रणा सतर्क होती.
मुख्यमंत्री फडणवीस हे कोल्हापुरातून विमानतळाकडे जाताना, उजळाईवाडी परिसरात गनिमी काव्याने उसाच्या कांड्या ताफ्यातील वाहनांवर फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. काही क्षणातच मुख्यमंत्र्यांचा ताफा आल्याने पोलिसांनी कांड्या गोळा करून बाजूला केल्या.
राज्यात ऊस दराचे आंदोलन पेटलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर त्याबाबत काहीतरी भाष्य करणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. एकीकडे काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांना कारवाईचा इशारा देत असताना ऊस दराबाबत कारखानदारांचे कान धरायला हवे होते. तसे न करताच ते मुंबईला निघाल्याने हा प्रकार घडला. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)