Kolhapur: गव्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, महिन्यात तिसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:06 IST2025-12-27T16:04:41+5:302025-12-27T16:06:25+5:30
गव्यांच्या वाढत्या उपद्रवमुळे शेतकरी त्रस्त, ठोस उपाययोजनाची गरज

Kolhapur: गव्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, महिन्यात तिसरी घटना
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील किसरूळ येथे गव्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बंडा पांडू खोत (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी घडली होती.
याबाबत माहिती अशी की, बंडा खोत हे दुपारच्या सुमारास वैरणीसाठी खापर मळा येथील शेतात गेले होते. यावेळी शिवारात दबा धरून बसलेल्या गव्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खोत यांच्या छातीवर जोराचा मार बसला तसेच पायांवर जखमा. गव्यांच्या हल्ल्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना ते शेतातच जखमी अवस्थेत कोसळले.
सायंकाळ झाली तरी खोत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधमोहीम सुरू असतानाच रात्री साडेआठच्या सुमारास ते शेतात जखमी अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून रोज कुठे ना कुठे शेतकरी जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र वन विभागाकडून गव्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
पंचनाम्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यावर गव्याचा हल्ल्याचा प्रयत्न
वनाधिकारी व वनकर्मचारी मृत बंडा खोत यांच्यावर हल्ला केलेल्या ठिकाणी पंचनामा करत असताना ऊसात असलेल्या गव्याने वनकर्मचारी याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.