कोडोली : केखले (ता. पन्हाळा) येथील तुटलेल्या उसाचा पाला पेटवत असताना शेजारच्या फडाला आग लागून माणिक शामराव शिंगटे (वय ४२) या शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माणिक शिंगटे यांचे केखले येथील कुंभारकी नावाच्या वस्तीजवळच्या कारिदगी नावाच्या शेतातील ऊस दोन दिवसांपूर्वी कारखान्यास तुटून गेला होता. शनिवारी दुपारी फडातील पाला पेटविला असताना शेजारी उभ्या असलेल्या उसाला आग लागेल म्हणून ते जवळच थांबले होते; परंतु उन्हाची तीव्रता वाढल्याने अचानक शेजारच्या दिलीप पाटील यांच्या उभा असलेल्या उसाला आग लागली. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न माणिक शिंगटे यांनी केला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांनी उभा असलेल्या फडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी उसातून जलदगतीने बाहेर पडता न आल्याने ते आगीत होरपळले. माणिक यांच्या शेताशेजारील उसाला आग लागल्याचे समजल्याने त्यांचा मुलगा अभिषेक हा शेतात गेला. त्याने आपले वडील कोठे दिसतात का, याचा शोध घेतला असता ते आगीत होरपळून पडल्याचे दिसून आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली असून पुढील तपास स.पो.नि. दिनेश काशीद करीत आहेत.
...........
३० माणिक शिंंगटे