कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठावरील भूतबाधा प्रकरणी कुटुंबाची चौकशी, ..त्यामुळे गुन्हा दाखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:49 IST2025-06-12T11:45:43+5:302025-06-12T11:49:04+5:30

शिक्षित कुटुंबातही अंधश्रद्धा, गैरप्रकार रोखण्यासाठी गस्त वाढवली

Family inquiry in connection with ghost haunting on the banks of Panchganga river in Kolhapur | कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठावरील भूतबाधा प्रकरणी कुटुंबाची चौकशी, ..त्यामुळे गुन्हा दाखल नाही

कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठावरील भूतबाधा प्रकरणी कुटुंबाची चौकशी, ..त्यामुळे गुन्हा दाखल नाही

कोल्हापूर : पंचगंगा नदी काठावर महिलेला झालेली भूतबाधा काढण्याचा प्रकार करणाऱ्या कुुटुंबाची लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशी केली. परडी करण्यासाठी घाटावर गेल्यानंतर अचानक महिलेच्या अंगात आल्याने तो प्रकार घडला. यात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही प्रकार नव्हता, असे लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडू नयेत यासाठी गस्त वाढवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी सर्वच पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.

पंचगंगा नदी घाटावरील भूतबाधा काढण्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्ह्याच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जात होती. लक्ष्मीपुरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन व्हायरल व्हिडीओची तपासणी केली. व्हिडीओत दिसणाऱ्या शुक्रवार पेठेतील जोशी गल्ली येथे राहणाऱ्या कुटुंबाला चौकशीला बोलावले. 

संबंधित कुटुंबातील विवाहित मुलीचा परडी विधी असल्याने त्या पुण्यातून माहेरी आल्या होत्या. पूजा-विधी दरम्यान अचानक त्यांच्या अंगात आल्याने हा प्रकार घडला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यात अंधश्रद्धा पसरवण्याचा, फसवणूक करण्याचा किंवा अघोरी पूजेचा काही संबंध नसल्याने गुन्हा दाखल केला नाही, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.

शिक्षित कुटुंबातही अंधश्रद्धा

'शिक्षणाने अंधश्रद्धा कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र अनेक शिक्षित लोक अंधश्रद्धा बाळगतात आणि त्याला खतपाणीही घालतात. कुंडली पाहण्यापासून ते पशू-पक्षी बळी देण्यापर्यंत अनेक प्रकारातून भीती घातली जाते. त्यामुळे शिक्षित लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे', असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात कोरी यांनी व्यक्त केले.

Web Title: Family inquiry in connection with ghost haunting on the banks of Panchganga river in Kolhapur