कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर भूतबाधा काढण्याचा प्रकार, पूजा-विधीचा व्हिडिओ व्हायरल

By उद्धव गोडसे | Updated: June 10, 2025 16:40 IST2025-06-10T16:37:00+5:302025-06-10T16:40:46+5:30

पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या प्रकारात वाढ

Exorcism at Panchganga river ghat in Kolhapur, video viral | कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर भूतबाधा काढण्याचा प्रकार, पूजा-विधीचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर भूतबाधा काढण्याचा प्रकार, पूजा-विधीचा व्हिडिओ व्हायरल

उद्धव गोडसे

कोल्हापूर : महिलेला भूतबाधा झाल्याचे समजून पंचगंगा नदी घाटावर पूजा-विधी करीत भूतबाधा काढण्याचा प्रकार सोमवारी (दि. ९) मध्यरात्री सुरू होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा आणि मांत्रिकावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. दरम्यान, पुरोगामी म्हणवणा-या कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढत असल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून उमटत आहेत.

एरवी रात्रीच्या जेवणानंतर पाय मोकळे करण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर फेरफटका मारणा-या पेठेतील कोल्हापूरकरांना रस्सा मंडळे, जेवणावळ्या नेहमीच्या असतात. सोमवारी रात्री मात्र नदी घाटावर वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. बाहेरगावातून आलेले १० ते १२ लोक काहीतरी पूजा-विधी करीत होते. यात दोन महिलांचाही समावेश होता. 

अचानक एका महिलेच्या अंगात येते. विचित्र हास्य करीत ती घुमत होती. समोर बसलेल्या मांत्रिकाने काही विधी करून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. याबाबत काही तरुणांनी विचारणा केली असता भूतबाधा, लागीर काढले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याचा पाच मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच कोल्हापूरच्या पुरोगामीत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिस काय करणार?

पंचगंगा नदी घाटावर गैरप्रकार करून अंधश्रद्धा पसरवणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशा घटना घडताच पोलिसांनी स्वत:हून याची दखल घेत कारवाई करावी, अशी मार्गदर्शक सूचना कायद्यात आहेत. त्यामुळे पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष असल्याचे अंनिसच्या पदाधिका-यांनी सांगितले. 

भोंदूगिरीचे प्रकार वाढले

गुप्त धनासाठी अघोरी पूजा करणे, मुलींच्या फोटोंना टाचण्या लावून ते झाडांवर चिकटवणे, उतारे टाकणे.. असे प्रकार अलीकडे वाढले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही भोंदूगिरीचे प्रकार सुरू आहेत. काही शिक्षित लोकांचाही यात सहभाग वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Exorcism at Panchganga river ghat in Kolhapur, video viral