कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितल्याने भाजपमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु तूर्त तरी उद्धवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे व ‘गोकुळ’चे संचालक अंबरीष घाटगे वगळता ताकदवान नेत्याचा प्रवेश धूसर आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे बहुमत मिळवल्यानंतर त्यांच्याकडे प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातही शिंदेसेना व भाजपमध्ये जाणारे अधिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मित्रपक्षांमुळे भाजपची प्रत्येक तालुक्यात ताकद दिसते. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर सदस्य आणायचे झाल्यास स्वत:ची ताकद महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्यांनी प्रत्येक तालुक्यातील ताकदवान पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याच्या जोडण्या लावल्या आहेत. त्यातूनच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची यादी आपल्याकडे तयार आहे, असा हबका डाव टाकला.
महिन्याअखेर घाटगेंचा प्रवेश
संजय घाटगे यांचा प्रवेश गेली महिनाभर रखडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या महिन्याअखेर मुंबईत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.शहरातील अनेकजण इच्छुककोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नियाेजन केले आहे. त्यातून अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक असून त्यांना पक्षात घेतल्यानंतर पूर्वीचे इच्छुक दुखावणार नाहीत ना? याची दक्षता घेतली जात आहे.
भाजपमध्ये येण्यास अनेक इच्छुक तयार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. - नाथाजी पाटील (जिल्हाध्यक्ष, भाजप)