Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:49 IST2025-07-07T16:48:54+5:302025-07-07T16:49:16+5:30
अस्तित्त्वासाठी झुंज

Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तरी नेत्यांची मानसिकता बदलत नसल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उद्रेक पाहावयास मिळू लागला आहे. आपापल्या मतदारसंघापुरते राजकारण, वेळ पडल्यास दुसऱ्या मतदारसंघात मित्रत्त्वाचे नाते जोपासणे हे धोरणच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर आल्याने या पक्षाची वाढ खुंटली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची नव्याने स्थापना झाली तरी पदाधिकाऱ्यांचे हे दुखणे मात्र जुनेच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्यातील वजनदार नेत्यांच्या ताकदीवर उभा राहिलेला पक्ष, असेच म्हटले जाते. त्याला कारणेही तशीच असून, प्रत्येक जिल्ह्यातील साखर कारखानदार व सहकारातील बड्या नेत्यांना घेऊन पवार यांनी १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पंधरा वर्षे पक्ष सत्तेत राहिला. त्या सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष मजबुतीने उभा राहणे अपेक्षित होते.
पण, प्रत्येक जिल्ह्यात या नेतेमंडळींनी सत्तेच्या ताकदीचा वापर आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवल्याने पक्ष मजबुतीने वाढलाच नाही. त्यामुळे चार जिल्ह्यांपुरता राष्ट्रवादी काँग्रेस असे हिणवले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी नवीन राष्ट्रवादीची स्थापना केली. एकसंध असताना अडचणीत असलेल्या पक्षाला फुटीनंतर आता कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तर एकसंध राष्ट्रवादी असताना आमदार, खासदारांचा आलेख खाली आला. आपल्या मतदारसंघापुरतेच बघायचे, हे नेत्यांचे धाेरणच पक्षाला मारक ठरले. फुटीनंतरही तोच कित्ता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने गिरवला, ‘कागल’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ या विधानसभेच्या तीन जागा लढवल्या, हे मतदारसंघ सोडून पक्षाचे नेते इतर मतदारसंघात लक्ष देत नाहीत, असा थेट आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला.
आवळे यांच्या आरोपात तथ्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असतानाही ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’ सोडले, तर इतर सात मतदारसंघात नेत्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी पक्ष अस्तित्वशून्य बनले. फुटीनंतरही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फारसा बदल झाला नाही, हे वास्तव आहे.
सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, यामध्ये २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२३ हा सहा वर्षाचा कार्यकाळ सोडला तर अखंडपणे पक्ष सत्तेत आहे. पक्षच नव्हे, काही नेतेच सत्तेत राहिले आहेत. एकूण वाटचाल पाहिली तर सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाही, असेच चित्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात आहे.
राजीव आवळे यांची खदखद योग्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असताना या चुका झाल्याने पक्ष वाढीवर मर्यादा आल्या. मात्र, आता तसे होणार नाही. प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका आमची आहे. - आर. के. पोवार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)