उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश, कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:02 IST2025-02-06T12:01:56+5:302025-02-06T12:02:20+5:30
कोल्हापूर : उद्धवसेनेचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पण त्यांना राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागला ...

उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश, कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता
कोल्हापूर : उद्धवसेनेचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पण त्यांना राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागला असून, पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन तशा भावना कळविल्या आहेत.
राज्यात महायुतीने एकहाती सत्ता मिळविल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धवसेनेतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत चलबिचल सुरू आहे. त्यातून आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करून आपले राजकीय पुर्नवसन होते का, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच कोल्हापूर शहरातील उद्धवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने थेट मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन पक्षात घेण्याबाबत विनंती केल्याचे समजते.
महापालिकेच्या राजकारणात मुश्रीफ व या पदाधिकाऱ्याचे चांगले संबंध आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. पण त्यांना पक्षात घेण्यास काही माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे. संबंधिताला पक्षात प्रवेश दिला तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिल्याचे समजते.
जिल्हाध्यक्षपदासाठी आग्रही..
या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबरोबर आपणाला जिल्हाध्यक्ष पद द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते. उद्धवसेनेत तीन जिल्हाप्रमुख आहेत, त्याप्रमाणे तीन तालुक्यांचा जिल्हाध्यक्ष करा, असा त्यांचा आग्रह आहे.