Kolhapur News: दाजीपूर अभयारण्यात ३०, ३१ डिसेंबरला प्रवेशबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:05 IST2025-12-26T12:05:18+5:302025-12-26T12:05:48+5:30
नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे

Kolhapur News: दाजीपूर अभयारण्यात ३०, ३१ डिसेंबरला प्रवेशबंदी
राधानगरी : सरत्या वर्षाला निरोप देताना पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत अतिउत्साही युवा पिढी ३१ डिसेंबर साजरा करताना दिसते. शहरी भागातील हे फॅड ग्रामीण भागातही चांगलेच रुजले आहे. हे करीत असताना अनेकदा अनुचित प्रकार घडतात. हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी ३० व ३१ डिसेंबरला राधानगरी दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या नावाखाली राधानगरी, दाजीपूर अभयारण्य परिसरात चुली मांडून जेवणावळी करून नशेत गाण्याच्या ठेक्यावर थिरकणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहे. नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे आहे.
येथील विपुल वनसंपदा जपणे काळाची गरज आहे. शहरी पर्यटक तसेच काही हौशी लोकांकडून दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, काचा फोडणे, कचरा करणे, जंगलामध्ये वणवा लावणे, शिकार करणे असे अनधिकृत प्रकार घडू शकतात. काही हुल्लडबाज तरुणाईच्या असल्या कृत्यामुळे येथील पर्यटनाला खीळ बसते.
असे प्रकार टाळण्यासाठी वनविभागाकडून प्रत्येक वर्षी डिसेंबरअखेर दोन दिवस दाजीपूर अभयरण्यात प्रवेश बंद केला जातो. ३५१ चौरस किमी पसरलेला स्वर्गाहून सुंदर दाजीपूर अभरण्याच्या परिसरातील देवराई, बॅकवॉटर आणि पश्चिम घाटात आढळणाऱ्या दुर्मीळ रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे जतन, संरक्षण आणि संवर्धन केल्यास खऱ्या अर्थाने नववर्षाचे स्वागत होईल, असा विश्वास पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.
३० व ३१ डिसेंबर हे दोन दिवस दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असून, अभयरण्य क्षेत्रात अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल. - आर. डी. घुणकीकर, परिक्षेत्र वन अधिकारी, दाजीपूर.