Kolhapur- उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: स.पो.नि. राऊतचे तपासाला असहकार्य, आज न्यायालयात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:05 IST2023-06-30T13:05:30+5:302023-06-30T13:05:45+5:30
आरोपींची बाजू मांडण्यासाठी संकेश्वरचे वकील न्यायालयात उपस्थित राहणार का?

Kolhapur- उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: स.पो.नि. राऊतचे तपासाला असहकार्य, आज न्यायालयात हजर करणार
गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे तिहेरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासातील मुख्य आरोपी येथील ‘ती’ माजी नगरसेविका आणि अमरावतीचा सपोनि राहुलकुमार राऊत तपासाला सहकार्य करत नाहीत, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. पाच दिवसांची पोलिस कोठडी आज (शुक्रवारी) संपत आहे. त्यामुळे त्या दोघांना पुन्हा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात येणार आहे.
आठवड्यापूर्वी येथील उद्योजक शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांनी राहत्या घरातील बेडरुममध्ये विष प्राशन करून व गळे चिरून घेऊन आत्महत्या केली. ‘ती’ माजी नगरसेविका आणि राऊत यांनी संगनमताने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून १ कोटीची खंडणी मागून त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद असल्यामुळे त्या नगरसेविकेसह राऊतविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विजापूर येथील हॉटेलातून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी ३० जूनपर्यंत मिळालेली पोलिस कोठडी आज संपत आहे. पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी घटनास्थळी सापडलेली सुसाईड नोटच्या आधारे त्यांच्याकडे कसून चौकशी केली. परंतु, ‘त्यांच्या आत्महत्येशी आमचा काही संबंध नाही, आम्ही काही केले नाही’, असे त्यांचे म्हणणे आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट, न्यायनिवाडा लोकनेता फाउंडेशनसह येथील महिला कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी या प्रकरणाची ‘सीबीआय’कडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
‘फॉरेन्सिक लॅब’च्या पथकाने दुसऱ्यांदा घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यामुळे या घटनेचे गूढ अद्यापही कायम आहे. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिकारी तपास करीत आहेत.
संकेश्वरचे वकील येणार का?
गडहिंग्लज अॅडव्होकेट बार असोसिएशनने या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरोपींनी आपली बाजू मांडण्यासाठी संकेश्वर येथील अॅड. संजय मगदूम व सागर माने यांना बोलावून घेतल्याने संतप्त नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आरोपींची बाजू मांडण्यासाठी पुन्हा ते न्यायालयात उपस्थित राहणार का? याची शहरासह जिल्ह्यात चर्चा आहे.