कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज; डीजीसीएच्या नियमावलीनुसार कार्यवाही, अधिकाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:35 IST2026-01-29T15:34:19+5:302026-01-29T15:35:38+5:30
बारामतीजवळ विमान उतरण्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताच्या निमित्ताने विमान प्रवास आणि विमानतळांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत

संग्रहित छाया
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशातील विमानसेवा आणि विमानतळांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. डीजीसीए म्हणजे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून विमानतळांना नियमित सुरक्षेच्या सूचना दिल्या जातात. त्यांचे काटेकोर पालन केले जाते. त्यानुसार कोल्हापूर विमानतळावर नेहमीच सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असतात, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली.
बारामतीजवळ विमान उतरण्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या अपघाताच्या निमित्ताने विमान प्रवास आणि विमानतळांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
वाचा: अजितदादांचा कोल्हापूरकरांशी जिव्हाळा शेवटपर्यंत...!
याबाबत कोल्हापूर विमानतळावरील सुरक्षेबद्दल विमानतळ प्राधिकरण अधिकारी अनिल शिंदे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'कोल्हापूर विमानतळ हे डीजीसीएच्या नियमावलीनुसार चालते. रडार यंत्रणा, संदेशाचे दळणवळण, धावपट्टीची सुरक्षा अशा सर्वच बाबतीत नियमित तपासणी केली जाते. त्याचे अहवाल वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास पाठवले जातात. विमानतळावर अग्निशामक यंत्रणा आणि वैद्यकीय सुविधा २४ तास सज्ज असतात. डीजीसीएच्या नियमावलीनुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जाते.'