Traffic Jam: बापरे... पुण्यासाठी अकरा, मुंबईसाठी अठरा तासांचा प्रवास; महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:06 IST2025-10-28T14:06:10+5:302025-10-28T14:06:39+5:30
Mumbai Pune Traffic Jam: परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांचा दिवस- रात्र वाहनांतूनच प्रवास

Traffic Jam: बापरे... पुण्यासाठी अकरा, मुंबईसाठी अठरा तासांचा प्रवास; महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना फटका
कोल्हापूर : प्रवाशांची प्रचंड गर्दी, गाड्यांची कमतरता, रोडवरील वाहतुकीच्या कोंडीने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या पुणे, मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर आगारातून रविवारी दुपारी दोन वाजता निघालेली एसटी रात्री एक वाजता पुण्यात पोहोचली. एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, कारने निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागला.
एरव्ही पाच तास पुण्याला पोहोचण्यासाठी लागतात. प्रवाशांना तब्बल ११ तास लागले. मुंबईसाठी शनिवारी रात्री अकरा वाजता निघालेल्या एसटी ट्रॅव्हल्स रविवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहानंतर मुंबईत पोहोचल्या. मुंबईसाठी सरासरी १८ तासांचा कालावधी लागला.
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर नागरिक परत त्यांच्या कामाच्या ठिकाणी, नातेवाइकांकडे सुटीसाठी आलेले परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची गर्दी मध्यवर्ती बसस्थानक, खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेसाठी झाली. कोल्हापुरातून मुंबई, पनवेल, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक मार्गावर अनेकांचा प्रवास झाला. कोकण आणि इतर भागांतील नागरिक परतीच्या प्रवासासाठी गेले. मध्यवर्ती बसस्थानकात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी झाली. विशेषत: पुणे आणि मुंबई मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल झाल्या. एसटीची गर्दी ट्रॅव्हल्सकडे वळल्याने पुणे, मुंबई, सोलापूर, पुणे मार्गावरील तिकीट दर दुप्पट झाले.
अधिकारी गायब
प्रवाशांची गर्दी असल्याने मुंबई, पुणे जाणाऱ्या एसटी उशिरा सोडल्या. त्यामुळे प्रवाशांनी या प्रकाराचा संताप व्यक्त केला. त्याचा जाब विचारण्यासाठी काही प्रवासी वाहतूक निरीक्षकांकडे गेले. मात्र, तेथे कोणीच हजर नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
कोंडी कुठे
किणी, तासवडे टोल नाका, कराड, सातारा, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे प्रवेशद्वार, कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, जुना बोगदा, खेड शिवापूर टोलनाका परिसर, लोणी काळभोर - सोलापूर महामार्ग, वाघोली, केसनंद, शिक्रापूर नगर रस्ता, भोसरी, चाकण औद्योगिक क्षेत्र, किवळे- देहूरोड चौक, भूगाव आणि लोणावळा परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. प्रमुख मार्गावर एक ते दोन किलोमीटरची रांग लागली.
दोन किलोमीटरच्या अंतरासाठी दीड तास
कोल्हापूर ते पुणे, मुंबई मार्गावर वाहतूक कोंडीने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे दोन किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी दीड तासांचा वेळ लागल्याचे काही वाहनधारकांनी सांगितले.
रविवारी रात्रीच्या कोल्हापूर - पुणे बसमधून प्रवास केला. कोल्हापुरातून बाहेर पडण्यासाठी एक तास लागला. खराब रस्ते, वाहतुकीची ठिकठिकाणी झालेली कोंडी, वाहनांच्या गर्दीने पुण्याला पोहोचण्यासाठी ११ तास लागल्याने नियोजन कोलमडले. - ऋषिकेश चव्हाण, आयटी नोकरदार
एरव्ही पुण्याला पाच तास वेळ लागतो. परंतु वाहतुकीची कोंडी त्यात पाऊस त्यामुळे कोल्हापुराहून मी कारमधून संध्याकाळी सहा वाजता निघालो होतो तर पहाटे पावणे चार वाजता हिंजवडी येथे पोहोचलो. कोल्हापूरमधून निघालेल्या अनेकांना सात ते दहा तास पुण्याला जाण्यासाठी लागले आहेत. - अथर्व देशपांडे, संगणक अभियंता
प्रवाशांच्या मागणीनुसार जादा एसटी सोडल्या. मात्र, वाहतुकीची प्रचंड कोंडी असल्याने वेळापत्रक बिघडले. कराड, सातारा, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्याने नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ पोहोचण्यासाठी लागला. - यशवंत कानतोडे, प्रभारी विभाग नियंत्रक