मुदत संपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:32 IST2025-11-18T17:32:01+5:302025-11-18T17:32:27+5:30
येणार ‘प्रशासक’, अन्य निवडणुकांमुळे होणार विलंब

मुदत संपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे जाणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे. परंतु, नगर पंचायत, नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुकांचे नियोजन असल्यामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या या सर्व ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक’ नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
सन २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांचीही निवडणूक होणार आहे.
त्यामुळे या तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेत प्रशासन गुंतल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाआधी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु, आधीच जाहीर निवडणुकांमुळे जिल्हा प्रशासन या कालावधीत या निवडणुका घेऊ शकणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींपैकी ४२१ ग्रामपंचायतींवर जानेवारीनंतर प्रशासक येण्याची शक्यता आहे.