दिंडनेर्ली : पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास सहकार्य केले नसल्याच्या रागातून (नागाव, ता. करवीर)चे सरपंच सतपाल मगदूम यांच्यासह इतर आठ जणांना दगड, काठीच्या साह्याने मारहाण केली आहे. यामध्ये कृष्णात महादेव शिंदे, अवधूत श्रीपती शिंदे (नागाव ता. करवीर) हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी नंदगाव येथील कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सनी नरके यांच्यासह ११ जणांवर इस्पूर्ली पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडनेर्ली पं.स. गणात काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदगाव येथील सुजाता सनी ऊर्फ मनीष नरके या तर भाजपच्या वतीने दिंडनेर्ली येथील राजश्री सुरेश पाटील यांच्यात लढत झाली होती. यामध्ये राजश्री पाटील यांनी विजय मिळवला. निवडणुकीतील पराभव नरके गटाच्या जिव्हारी लागला होता. निकाल लागल्यापासून नागावचे सरपंच सतपाल मगदूम यांनी आपल्याला मदत केली नसल्याचा राग नरके गटात धुमसत होता. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये सतपाल मगदूम व नरके गटाचे काही तरुण यांच्यात बाचाबाची झाली होती. काहींनी मध्यस्थी करून वाद थांबविला होता. पण, गावी आल्यानंतर नरके गटाचे पंधरा ते वीस जण नागावमधील बिरदेव मंदिरासमोरील चौकात गेले. सरपंच सतपाल मगदूम, कृष्णात शिंदे, अवधूत शिंदे, संभाजी मगदूम, मोहन मगदूम, कृष्णात खामकर, निवास कराडे, मारुती कांबळे, अनिल तेली (सर्व रा. नागाव) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये कृष्णात शिंदे व अवधूत शिंदे जखमी झाले. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. दगडफेकीत दुचाकी व चारचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.सतपाल मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनिष ऊर्फ सनी पांडुरंग नरके, संग्राम नरके, पांडुरंग नरके, विजय गायकवाड, जयवंत नरके, ऋषी झांबरे, राहुल नरके, राकेश नरके, प्रमोद नरके, सचिन टिके, विठ्ठल चौगुले (सर्व रा. नंदगाव) यांच्यासह अन्य ५ ते ६ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. करवीरचे पोलिस अधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन कारवाईच्या सूचना दिल्या. अधिक तपास साहाय्यक फौजदार किरण माने करीत आहेत.
Web Summary : Following Panchayat Samiti election disputes, a village head and eight others were attacked. Police booked 11 individuals, including a Youth Congress leader, for assault and property damage in Nagao.
Web Summary : पंचायत समिति चुनाव विवाद के बाद, एक सरपंच और आठ अन्य पर हमला किया गया। पुलिस ने युवा कांग्रेस नेता सहित 11 लोगों पर मारपीट और संपत्ति को नुकसान पहुंचाने का मामला दर्ज किया।