Kolhapur: विधानपरिषदेची जोडणी; ‘गडहिंग्लज’करांना ताकद देण्यात नेत्यांची ‘चढाओढ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:28 IST2025-07-01T16:28:04+5:302025-07-01T16:28:30+5:30

जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका

Efforts to support local parties and groups in Gadhinglaj Municipality elections keeping in mind the calculations of the Legislative Council elections | Kolhapur: विधानपरिषदेची जोडणी; ‘गडहिंग्लज’करांना ताकद देण्यात नेत्यांची ‘चढाओढ’!

Kolhapur: विधानपरिषदेची जोडणी; ‘गडहिंग्लज’करांना ताकद देण्यात नेत्यांची ‘चढाओढ’!

राम मगदूम

गडहिंग्लज : जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका म्हणून गडहिंग्लजकडे पाहिले जाते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचे गणित डोक्यात ठेवूनच येथील नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पक्ष-गटांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न नेहमी होतो. मात्र, जनता दलाचे ज्येष्ठ नेते ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात होणाऱ्या निवडणुकीत गडहिंग्लजकरांना ‘ताकद’ देण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांत चढाओढ सुरू आहे.

अपवाद वगळता तब्बल ४० वर्षे गडहिंग्लज नगरपालिकेवर ॲड. शिंदे यांचे वर्चस्व राहिले. शिंदेंच्या निधनानंतर त्यांच्याच विचाराने पुढील वाटचाल करण्याचा निर्णय त्यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी घेतला. मात्र, काही दिवसांतच जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांशी न जुळल्याने त्यांच्यात मतभेद झाले. त्याची उघड चर्चा होताच पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे बंधू अर्जुन आबीटकर यांनी खणगावे-भद्रापूर यांची भेट घेऊन ‘ताकद’ देण्याची ग्वाही दिली. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जुन्या-नव्यांना आमने-सामने बसवून वादावर पडदा टाकला. त्यांच्यात दिलजमाई झाली असली तरी जिल्ह्यातील नेत्यांकडून गडहिंग्लजकरांना ‘ताकद’ देण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.

खणगावे-भद्रापूर यांनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करताच माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वाती कोरी यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी जनता दलातच राहून वाटचाल केली तरी त्यांना ‘ताकद’ देण्याचा शब्द दिला. परिणामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या प्रचारात कोरींनी आक्रमक पुढाकार घेतला. एव्हाना, त्यांनी विधानपरिषद गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांना जिल्ह्यात सर्वप्रथम पाठिंबा दिला होता.

‘रेडिमेड’ कार्यकर्त्यांवर डोळा

गडहिंग्लज शहरात जनता दल व राष्ट्रवादी हेच एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. भाजपा, काँग्रेस, उद्धवसेना, शरदचंद्र पवार पक्ष, शिंदेसेना, मनसे यांचा प्रभाव मर्यादित आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक जनता दल व राष्ट्रवादी भोवतीच फिरणार आहे. म्हणूनच मंत्री आबीटकर यांच्यासह खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील ही मातब्बर मंडळी येथील ‘रेडिमेड’ कार्यकर्त्यांवर डोळा ठेवून आहेत.

शिंदे-कुपेकरांनी दाद दिली नव्हती !

श्रीपतराव शिंदे यांच्या नगरपालिकेवरील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न बाबासाहेब कुपेकर यांनीही दोनदा केला होता. मात्र, दोघांनीही जिल्हा पातळीवरील नेत्यांना कधीच दाद दिली नव्हती. तवंदीघाटाच्या पलीकडील लोकांनी गडहिंग्लजमध्ये लुडबूड करू नये, असे कुपेकर म्हणायचे तर शिंदेंनी आयुष्यभर ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. त्यांच्या हयातीत जिल्ह्यातील नेत्यांनी गडहिंग्लज पालिकेच्या राजकारणात कधीही लक्ष घातले नव्हते. मात्र, दोघांच्या पश्चात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्यामुळेच जिल्ह्यातील नेत्यांकडून गडहिंग्लजकरांना ‘ताकद’ देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Efforts to support local parties and groups in Gadhinglaj Municipality elections keeping in mind the calculations of the Legislative Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.