डोणेवाडीत विकासाची पहाट उगवणार तरी कधी?

By Admin | Updated: December 17, 2014 23:11 IST2014-12-17T20:35:10+5:302014-12-17T23:11:20+5:30

मूलभूत सुविधांचीही वानवा : होडीनेच करावा लागतो प्रवास; गावात अजूनही एस.टी. पोहोचलेलीच नाही

Dunnewadi dawn of development? | डोणेवाडीत विकासाची पहाट उगवणार तरी कधी?

डोणेवाडीत विकासाची पहाट उगवणार तरी कधी?

रवींद्र हिडदुगी- नेसरी -गडहिंग्लज तालुक्यातील डोणेवाडी हे घटप्रभा नदीकाठावर वसलेले छोटेसे गाव. स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटूनही डोणेवाडी गाव अनेक सेवा-सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्याप साधी एस. टी.बसही पोहोचलेली नाही. अंतर्गत रस्त्यांबरोबरच गावाला जोडणारा हडलगे-डोणेवाडी रस्ताही खराब झाला आहे. सुधारित नळपाणी पुरवठा अर्धवट आहे. सौरऊर्जेचे बहुतांश दिवे बंद असून, गावातील विकासकामांचे कित्येकवेळा नारळ फुटले; मात्र विकासकामांचा पत्ताच नाही.
नेसरी ते डोणेवाडी हे अंतर केवळ दीड-दोन कि.मी. असताना केवळ शासन आणि आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे घटप्रभा नदीवर साकव अथवा पूल झालेला नाही. आतापर्यंतच्या पिढीने होडीनेच प्रवास करीत व पायवाटा तुडवत दिवस काढले; मात्र आता नव्या पिढीला हे मान्य नाही. त्यांना त्यांचा अधिकार, हक्क व सेवा-सुविधा हव्या आहेत. केवळ दीड-दोन कि.मी.च्या अंतरासाठी त्यांना हडलगे किंवा सांबरे मार्गे वाहनाने नेसरीला पोहोचायचे झाल्यास १० ते १५ कि.मी.चा प्रवास करावा लागतो.
विद्यार्थ्यांना उन्हाळा-पावसाळा पायीच प्रवास करून नेसरी गाठावी लागते. ऐन पावसाळ्यात होडी बंद होत असल्याने त्यांना हडलगे मार्गे यावे लागते. शिवाय होडीतून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो तो वेगळाच. नदीवर घाट बांधला नसल्याने महिलांचीही धुणे धुण्यासाठी गैरसोय होत आहे.
या गावाला स्मशानशेडही नाही. सुधारित न.पा.पु. योजना अर्धवट आहे. शाळा-इमारती पक्क्या नाहीत. या व अशा अनेक प्रश्नांची मालिका खंडित कधी होणार, असा शासनासह सर्वच लोकप्रतिनिधी, गावपुढारी व नेत्यांना नागरिकांचा सवाल आहे.


नदीच्या अलीकडे व पलीकडे डोणेवाडी व नेसरीतील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यांना शेतजमीन कसण्यासाठी व तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी नावेचाच आधार आहे. भर पावसाळ्यात नाव बंद होत असल्याने सर्वांचेच मोठे हाल होतात. तेव्हा काशिलिंग मंदिराजवळील किनाऱ्याजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास वाहतुकी-बरोबरच पाणी साठल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही.



ग्रामपंचायतीकडून प्राथमिक शाळा ते सांबरे फाटा रस्त्याचे दोन्ही बाजूंकडून झालेले अतिक्रमण हटविण्याबाबत निवेदन मिळाले आहे. गावात एस.टी. पोहोचणे महत्त्वाचे असून, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना सूचना देऊन अतिक्रमण हटविले जाईल.
- हनुमंत पाटील,
तहसीलदार गडहिंग्लज

Web Title: Dunnewadi dawn of development?