kolhapur Crime: बापानेच मुलाचा खून केला; अपघाताचा बनाव.., पण रक्ताच्या थेंबावरुन मोठा उलगडा झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:59 IST2023-06-16T13:05:27+5:302023-06-16T17:59:00+5:30
जबाबात संशय बळावल्याने वडील दिलीप व मोठा भाऊ सचिन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच दिली खून केल्याची कबूल

kolhapur Crime: बापानेच मुलाचा खून केला; अपघाताचा बनाव.., पण रक्ताच्या थेंबावरुन मोठा उलगडा झाला
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील एका बापाने साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मुलाचा खून केला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. राहुल दिलीप कोळी (वय ३१, रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव असून, याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
वडील दिलीप कोळी याच्यासह विकास पवार (तारदाळ), सतीश कांबळे (तमदलगे) या दोघा साथीदारांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तारदाळ हद्दीतील रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अपघात की घातपात, अशी शंका व्यक्त झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती व काही अंतरापर्यंत असलेले रक्ताचे थेंब यावरून तपास करत पोलिसांनी नातेवाइकांकडे चौकशी सुरू केली.
त्यामध्ये पोलिसांना जबाबात संशय बळावल्याने वडील दिलीप व मोठा भाऊ सचिन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच वडील दिलीप यांनी कौटुंबिक वादातून अन्य साथीदाराच्या मदतीने राहुलचा खून केल्याचे कबूल केले. राहुल हा विवाहित असून, तो मद्यपी असल्याने वारंवारच्या वादातून पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. त्यानंतरही त्याचा कुटुंबीयासोबत नेहमी वाद होत होता, असेही चौकशीत समजले आहे.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. त्यानंतर काही तासांतच या घटनेचा उलगडा झाला.