Kolhapur: महापूर नियंत्रणासाठी नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण, एक वर्षाची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:06 IST2025-01-30T12:05:46+5:302025-01-30T12:06:22+5:30

ट्रॅक्टबेल कन्सल्टंटकडून नवा आराखडा : ८ कोटींची निविदा मंजूर

Drone survey of rivers for flood control in Kolhapur, Sangli, one year period | Kolhapur: महापूर नियंत्रणासाठी नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण, एक वर्षाची मुदत

Kolhapur: महापूर नियंत्रणासाठी नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण, एक वर्षाची मुदत

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीला येणारा महापूर रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी राजापूरपासून कृष्णेपर्यंतच्या सर्व नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण व मॉडेलिंग केले जाणार आहे. पाटबंधारे विभागाने पूर नियंत्रणासाठी तयार केलेल्या ढोबळ आराखड्याला अनुसरून सविस्तर आराखडा गुडगाव दिल्लीतील ट्रॅक्टबेल कन्सल्टंट कंपनीकडून केला जाणार आहे. त्यासाठी ८ कोटींची निविदा २५ तारखेला मंजूर झाली असून, आराखडा बनविण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे.

कोल्हापूर व सांगलीला येणाऱ्या महापुरावरील उपाययोजनांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ३२०० कोटींचा आराखडा राबवला जाणार आहे. त्यासाठी मागील आठवड्यात बँकेचे पथक कोल्हापूर व सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. याचदरम्यान सविस्तर आराखडा बनविण्यासाठीची निविदा दिल्लीतील कंपनीला मंजूर करण्यात आली. त्यांना आराखडा बनविण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. या कंपनीचे काम ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

पाटबंधारे विभागाच्या आराखड्यामध्ये पूर नियंत्रणाच्या उपाययोजना मदत आणि पुनर्वसन असे विभाग आहे. काही ठिकाणी नदीच्या संगमाचे क्षेत्र बदलणे प्रस्तावित आहे, तर काही ठिकाणी विविध उपाययोजनांसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी मिळकतधारकांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. पाटबंधारे विभागाअंतर्गत ३२०० पैकी १६८० कोटींची कामे केली जाणार आहेत. तसेच, कोल्हापूरसाठी ८०० कोटी व सांगलीसाठी ८८० कोटी लागणार आहेत.

पहिला टप्पा असा

शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून राजापूरपासून कृष्णेपर्यंतच्या सर्व नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. कंपनीचे तज्ज्ञ त्याची सविस्तर माहिती घेऊन मॉडेलिंग तयार करतील. त्यानंतर आराखडा आकारास येईल. त्याचे सादरीकरण झाल्यावर सूचना, हरकतींचा अंतर्भाव करून अंतिम आराखडा मंजूर होईल.

पाटबंधारे विभागाने मांडलेला ढोबळ आराखडा

  • राधानगरी धरणाचे दरवाजे, सर्व्हिस गेटमध्ये बदल.
  • भोगावती नदीतील महापुराचे पाणी बोगद्याद्वारे दूधगंगा नदीत वळविणे.
  • महामार्गावरील पुलांखालील भराव काढून टाकणे.
  • नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे.
  • नद्यांचे रुंदीकरण करणे. मलबा काढणे.
  • नदी पात्राच्या तळातील गाळ काढून योग्य दिशेने पाणी प्रवाहित करणे.

Web Title: Drone survey of rivers for flood control in Kolhapur, Sangli, one year period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.