Kolhapur News: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:53 IST2026-03-25T11:53:23+5:302026-03-25T11:53:50+5:30

डॉ. युवराज पाटीलसह एजंट अटकेत, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे जप्त

Dr. Yuvraj Pandurang Patil continued his illicit abortion racket using a friend's license, despite having his own medical license suspended | Kolhapur News: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा

Kolhapur News: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा

कोल्हापूर : यापूर्वी दोनदा अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सापडलेला डॉ. युवराज पांडुरंग पाटील (वय ४३, रा. सोनाळी, ता. कागल) याने वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असतानाही मित्राच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता. बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉ. पाटील याच्याकडील गर्भलिंग तपासणीचे पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताची औषधे जप्त केली. डॉ. पाटील याच्यासह एजंट संभाजी वसंत शिंदे (वय ४५, रा. बोरवडे, ता. कागल) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

बिद्री येथील डॉ. युवराज पाटील याच्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळाली होती. याची पडताळणी करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एजंट संभाजी शिंदे याच्याशी संपर्क साधून चार महिन्यांच्या गर्भवतीची तपासणी करायची असल्याचे सांगितले. २२ हजार रुपयांत गर्भलिंग निदान करण्याचे ठरताच त्याने सोमवारी रात्री तपासणीसाठी महिलेस बोलवून घेतले. डॉ. पाटील याच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू होताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

वाचा: कोल्हापुरात अवैध गर्भपातात जुन्याच टोळ्या सक्रिय, शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

गर्भलिंग निदान करताना पाटील रंगेहाथ सापडला. तातडीने एजंट शिंदे यालाही पोलिसांनी अटक केली. श्रद्धा हॉस्पिटलच्या झडतीत गर्भलिंग निदान करण्याचे एक पोर्टेबल मशीन, गर्भपाताच्या गोळ्यांची दोन पाकिटे, दोन टॅब, तीन मोबाइल, पेशंटच्या नावांचे रजिस्टर, बिल रजिस्टर मिळाले. पाटील याची आलिशान फॉर्च्युनर कारही पोलिसांनी जप्त केली. डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई या नावाचे नोंदणी प्रमाणपत्र, वैद्यकीय परिषदेचा परवाना हॉस्पिटलमध्ये मिळाला. पाटील याचा वैद्यकीय सेवेचा परवाना दोन वर्षांपूर्वीच वैद्यकीय परिषदेने रद्द केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. या धक्कादायक प्रकाराने कारवाई करणारे पोलिस आणि वैद्यकीय अधिकारीही चक्रावले.

यापूर्वी दोन गुन्हे

‘बीएचएमएस’ पदवी घेतलेला डॉ. युवराज पाटील हा यापूर्वी गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्यात दोनदा सापडला होता. २००९ आणि २०२२ मध्ये त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या गुन्ह्यांचा आधार घेऊन वैद्यकीय परिषदेने त्याचा परवाना निलंबित केला. त्यानंतर डॉ. उत्तमकुमार सरदेसाई या मित्राच्या नावे तो हॉस्पिटल चालवत होता. डॉ. सरदेसाई यांचा शोध सुरू आहे. पाटील याची पत्नीही डॉक्टर असून, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे काय? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

३० ते ७० हजारांचे पॅकेज

गर्भलिंग निदान करण्यासाठी पाटील हा २० ते ३० हजार रुपये घेत होता. त्यानंतर गर्भपातासाठी ३० ते ४० हजार रुपये घेत होता. कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातून त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्ण येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title : कोल्हापुर: मित्र के लाइसेंस पर अवैध गर्भपात रैकेट का भंडाफोड़

Web Summary : कोल्हापुर पुलिस ने डॉ. पाटिल को अवैध गर्भपात रैकेट चलाने के आरोप में गिरफ्तार किया। पहले अपराधों के कारण लाइसेंस रद्द होने के बाद, वह दोस्त के लाइसेंस का उपयोग कर रहा था। प्रति प्रक्रिया ₹70,000 तक चार्ज करता था। एक एजेंट और पोर्टेबल अल्ट्रासाउंड मशीन भी जब्त की गई।

Web Title : Kolhapur Doctor Busted: Illegal Abortions Under Friend's License Uncovered

Web Summary : Kolhapur police arrested Dr. Patil for running an illegal abortion racket using a friend's license after his own was suspended for previous offenses. He charged up to ₹70,000 per procedure. An agent and portable ultrasound machine were also seized.