'...म्हणून विधान परिषदेची ब्याद नकोच'; राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची ऑफर दोन दिवसांत नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:59 AM2020-06-18T11:59:48+5:302020-06-18T12:49:50+5:30

विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

Don't miss the Legislative Council elections: Raju Shetty | '...म्हणून विधान परिषदेची ब्याद नकोच'; राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची ऑफर दोन दिवसांत नाकारली

'...म्हणून विधान परिषदेची ब्याद नकोच'; राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची ऑफर दोन दिवसांत नाकारली

googlenewsNext
ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच : राजू शेट्टीस्वाभिमान शेतकरी संघटनेत वादळ

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच अशी संतप्त भूमिका माजी खासदार आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी फेसबुकद्वारे जाहीर केली. विधान परिषदेच्या एका जागेवरून संघटनेत वादळ उठले असून प्रा.जालंदर पाटील, सावकार मादनाईक ही जवळची माणसेही उलटे बोलू लागल्याने राजू शेट्टी यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त करून या वादामागील बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

राजू शेट्टी म्हणतात, राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.

जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरलं, असं राजू शेट्टी यांनी सांगितले. 

माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्यानावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले.तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव ङॉ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात, अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच... शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही.

स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये.

मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असं राजू शेट्टी यांनी फेसबुकद्वारे सांगितले.

Read in English

Web Title: Don't miss the Legislative Council elections: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.