Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:03 IST2025-01-07T13:02:39+5:302025-01-07T13:03:01+5:30
पी.एन.पाटील जयंतीनिमित्त निर्धार

Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असला, तरी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील साडेअकरा लाखांहून मतदारांनी आपल्याला मतदान केले आहे. या मतदारांना वाऱ्यावर सोडायचे नाही. त्यामुळे पराभवाने हिंमत हरू नका, आहे ही एकी कायम ठेवा, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आपण पुन्हा भरारी घेऊ, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमेद जागवली. यावेळी त्यांनी सगळे संपली नाही, अजून बरेच काही शिल्लक आहे, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार असल्याचा संदेशही दिला.
माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार संजय घाटगे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, राजेंद्र मोरे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुयेकर उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, पी.एन.पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जात होते. त्यांच्या निष्ठेचा हाच विचार आपण तेवत ठेवूया. शाहू छत्रपती म्हणाले, पी.एन.पाटील हे एकनिष्ठतेचे उदाहरण होते. पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिले. कार्यकर्त्यांनीही त्यांचे एकनिष्ठ विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.
के.पी.पाटील म्हणाले, १९८५ पासून पी.एन. यांच्याबरोबर जिल्हा बँकेत एकत्र काम केले. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आमचे पक्ष वेगळे झाले. मात्र, त्यात कधीच कटुता आली नाही. एकनिष्ठतेचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शेकापचे बाबूराव कदम, उदय नारकर, भारती पोवार, सतीशचंद्र कांबळे, डी.जी.भास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धैर्यशील पाटील कौलवकर, दिलीप पवार, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, हिंदुराव चौगले, भारत पाटील भुयेकर, सरलाताई पाटील उपस्थित होते. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले.
करवीरचे ते मताधिक्य गेले कुठे?
लोकसभा निवडणुकीत मला ७४ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेला मात्र हे मताधिक्य गेले कुठे? असा सवाल शाहू छत्रपती यांनी केला.