कुत्री मेली, मासे मरताहेत, आता माणसं मरायची वाट..!; पंचगंगा प्रदूषणचा प्रश्न भयावह
By समीर देशपांडे | Updated: April 10, 2026 13:59 IST2026-04-10T13:58:59+5:302026-04-10T13:59:37+5:30
उपाययोजनेच्या घोषणा निवडणुकीपुरत्याच; न्यायालयाच्या निर्देशांनंतरही कार्यवाही कागदावरच

कुत्री मेली, मासे मरताहेत, आता माणसं मरायची वाट..!; पंचगंगा प्रदूषणचा प्रश्न भयावह
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : प्रत्येक वर्षी जानेवारी महिना संपत आला की नदीतील मासे मरायला सुरुवात होते, कुत्री नदीत मरून पडली तरी यंत्रणा लक्ष देत नाहीत. हेच पाणी कोल्हापूरच्या खाली असलेली गावे पितात. कुत्री मेली, मासे मरताहेत, आता माणसं मरायची वाट पाहताय का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गेली अनेक वर्षे पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकांच्या आणि भाषणातील घोषणेपुरताच उरला असून याच्या उपाययोजना म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याची टीका होत आहे.
वास्तविक गेल्या २५ वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुरू झाला याबाबत उच्च न्यायालयात २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल झाली तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आणि प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी बैठका झाल्या. परंतु तुटपुंज्या निधीच्या जोरावर अळू लावणे आणि बंधारे घालणे, दूषित पाण्याचे नमुने घेणे, पंचनामे करणे आणि अहवाल, नोटिसा पाठवणे या पलीकडे काहीही होत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे.
नदीकाठाला अनेक औद्योगिक वसाहती आहेत. साखर कारखाने आहेत. यातून दिवसाढवळ्या रसायनयुक्त पाणी पंचगंगेत मिसळत आहेत. त्यामुळेच पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि मासे मरायला सुरुवात होते. दरवर्षी हे चित्र दिसत असूनही नेतेमंडळी हे चित्र गांभीर्याने न घेता उलट गणेशमूर्ती नदीतच धरण्याचा आग्रह धरण्यात येतो. पर्यावरणविषयक कायदे आणि नियम याचा आधार घेत रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी सोडणाऱ्या आस्थापना आणि संस्था यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत या स्थितीत सुधारणा होणार नाही. ती धमक शासन दाखवणार हा हाच खरा प्रश्न आहे.
दृष्टिक्षेपात पंचगंगा खोऱ्यातील वसाहती
महानगरपालिका २: कोल्हापूर, इचलकरंजी
नगरपरिषदा/नगरपालिका ४ : हुपरी, हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड
औद्योगिक वसाहती ८: शिवाजी
उद्यामनगर कोल्हापूर, पुलाची शिरोली, गोकुळ शिरगाव, जवाहरनगर, आकिवाटे उद्योग क्षेत्र, पार्वती उद्योग क्षेत्र यड्राव, इचलकरंजी शहर प्रक्रिया, लक्ष्मी उद्योग क्षेत्र तिळवणी
साखर कारखाने ७ : दत्त साखर कारखाना आसुर्ले पोर्ले, डी. वाय. पाटील साखर कारखाना असळज, कुंभी कासारी साखर कारखाना कुडिओ, भोगावती साखर कारखाना परिते, राजाराम साखर कारखाना कसबा बावडा, पंचगंगा साखर कारखाना इचलकरंजी, दत्त साखर कारखाना शिरोळ
दिवसाढवळ्या रसायनयुक्त पाणी, सांडपाणी पंचगंगेत मिसळते त्यामुळेच मासे मरायला सुरुवात होते. २५ वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुरू झाला आणि आता तो गंभीर बनला आहे. याबाबत उच्च न्यायालयात २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल झाली तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगा नदीं प्रदूषणमुक्तीबाबत अधिकाऱ्यांच्या शेकडो बैठका झाल्या. मात्र निष्पन्न काही व्याले नाही.