Kolhapur News: नदीत पोहायला गेले, मगरीने ओढून नेले; दत्तवाडमध्ये जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:16 IST2025-12-02T18:16:17+5:302025-12-02T18:16:51+5:30
सहकाऱ्याने आरडाओरड केल्याने मगर त्यांना तेथेच सोडून निघून गेली. मात्र..

Kolhapur News: नदीत पोहायला गेले, मगरीने ओढून नेले; दत्तवाडमध्ये जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार
दत्तवाड : येथील दूधगंगा नदीत सकाळी पोहायला गेले असता, मगरीने केलेल्या हल्ल्यात जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार झाला. लक्ष्मण कलाप्पा कलगी (वय ६१, रा.दत्तवाड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
दत्तवाड (ता.शिरोळ) येथील ग्रामस्थ सकाळी पोहण्यासाठी नदीवर जातात. सोमवारी सकाळी सहा वाजता कलगीसह त्यांचे मित्र पोहायला गेले असता, कलगी यांच्यावर मगरीने हल्ला करत, त्यांना खोल पाण्यात ओढून नेले. त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने आरडाओरड केल्याने मगर त्यांना तेथेच सोडून निघून गेली. मात्र, तोपर्यंत कलगी यांचा मृत्यू झाला होता.
ग्रामस्थांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कलगी हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दत्तवाड शाखेत कार्यरत होते. याबरोबरच दत्त भजनी मंडळ आणि दत्त मंदिरातील कार्यक्रमात सहभागी होत होते. चारच दिवसांत होणाऱ्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमासाठी ते तयारी करत होते. मात्र, त्यापूर्वीच ही दु:खद घटना घडल्याने दत्तवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसांत झाली आहे. कलगी यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.