शेताच्या फूटभर जागेसाठी भाऊबंदकीचा 'बांध' फुटला; गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 'किती' गुन्हे दाखल..वाचा
By उद्धव गोडसे | Updated: May 23, 2025 15:49 IST2025-05-23T15:48:33+5:302025-05-23T15:49:01+5:30
हद्दीच्या वादातून वितुष्ट, ४० हून जास्त जखमी

शेताच्या फूटभर जागेसाठी भाऊबंदकीचा 'बांध' फुटला; गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 'किती' गुन्हे दाखल..वाचा
उद्धव गोडसे
कोल्हापूर : वळीवाच्या पावसाचे आगमन होताच शेतांच्या मशागतींची लगबग सुरू होते आणि हाच मुहूर्त साधून गावागावांत हद्दीच्या वादातून भाऊबंदकी उफाळून येते. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात हद्दीच्या वादांचे १४७ गुन्हे दाखल झाले. हाणामारीत ४० हून जास्त जण जखमी झाले, तर सुमारे ४०० जणांच्या मागे मशागत सोडून कोर्टकचेरीची कामे लागली आहेत. खरिपाच्या पेरण्या होईपर्यंत वाढणारे वाद नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
वळीव पावसापासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. बांधावरील झुडप, झाडे काढून टाकणे, शेतात वाढलेले तण काढणे, वाफे तयार करणे अशा अनेक कामांची घाई उठते. नेमके याच वेळी जमिनींची हद्द निश्चित करण्यावरून शेजाऱ्यांबरोबर वाद सुरू होतात. बांध आणि ताली फोडणे, हद्दीचे दगड हलविणे, वाट बंद करणे... अशा अनेक कारणांनी वादाला तोंड फुटते.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात शेतातील हद्दीच्या वादाचे १४७ गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रार अर्जांचे प्रमाण यापेक्षा दुपटीहून जास्त आहे. भाऊबंदकीचे काही वाद मिटविण्यात गावपातळीवर यश येते. मात्र, अनेक वादांमध्ये पोलिस ठाणे आणि कोर्टाची पायरी चढण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे शेतक-यांचा कामाचा वेळ आणि पैसाही वाया जात असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकारी व्यक्त करतात.
वादाची कारणे काय?
- जमिनीची शासकीय मोजणी झालेली नसणे
- हद्दीच्या खुना निश्चित नसतात
- पोटहिश्शांमधील वाद
- बांध आणि ताली फोडणे
- बांधावरील झाडे तोडणे किंवा कुंपण घालणे
- वाट बंद करणे
- एकमेकांच्या जमिनींवर हक्क सांगणे
- एकमेकांच्या विरोधात तक्रारी करणे
वादातून लाखो रुपयांचे नुकसान
एक-दोन फूट इकडे-तिकडे सरकून सामंजस्याने मार्ग काढण्याऐवजी वाढवलेला वाद शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करतो. रागाच्या भरात झालेल्या हाणामारीत एखाद्याचा जीव जाण्याचा धोका असतो. दरवर्षी अशा प्रकारच्या दोन-तीन घटना घडतात. अनेकजण जखमी होऊन आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. कोर्टकचेरीच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.
दाखल झालेले प्रमुख गुन्हे
पोलिस ठाणे - गुन्हे
आजरा : १६
हातकणंगले : १५
करवीर : १५
चंदगड : १४
शाहूवाडी :१४
भुदरगड : १२
पन्हाळा : १२
मुरगुड : १०
कागल : ११
पेठ वडगाव : ९
इस्पुर्ली : ६
जयसिंगपूर : ५
शिरोळ : ४
कोडोली : ४
तंटामुक्त समित्यांची जबाबदारी वाढली
हद्दीचे वाद वाढू नयेत यासाठी गावांतील तंटामुक्त समिती महत्त्वाची असते. दोन्ही तक्रारदारांना समोरासमोर घेऊन सामोपचाराने वाद मिटवले जाऊ शकतात. वाद वाढवून होणारे संभाव्य धोके आणि नुकसानीची जाणीव करून दिल्यास हद्दीचे वाद कमी होऊ शकतात. यासाठी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी हद्दीच्या वादाचे गुन्हे जास्त दाखल होतात. गेल्या महिनाभरात ही संख्या वाढलेली दिसते. असे गुन्हे वाढू नयेत यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिका-यांना दिल्या आहेत. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा