मृत अर्भकांची शेतात विल्हेवाट; कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुके गर्भपाताचे 'हॉटस्पॉट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:05 IST2025-11-27T12:05:18+5:302025-11-27T12:05:59+5:30
पट्टणकोडोलीत महिला डॉक्टरकडून गर्भपात

मृत अर्भकांची शेतात विल्हेवाट; कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुके गर्भपाताचे 'हॉटस्पॉट'
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पोलिस आणि आरोग्य विभागाकडून वारंवार कारवाई होऊनही जिल्ह्यात गर्भपाताचे अड्डे राजरोस सुरू आहेत. यातही संपूर्ण राधानगरी तालुक्यासह मलकापूर आणि पट्टणकोडोली हॉटस्पॉट बनले आहेत. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन ठराविक टोळ्यांनी त्यांचे गोरखधंदे सुरूच ठेवले आहेत. विशेष म्हणजे यात काही डॉक्टरांचाही समावेश असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.
बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रोखण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रबोधन आणि उपाययोजना केल्या जात असल्या तरी हा प्रकार राजरोस सुरूच आहे. वंशाला दिवा हवा, या अट्टहासातून गर्भातच कळ्या खुडल्या जात आहेत. गेल्या वर्षभरात कळंबा येथील एक महिला डॉक्टर या गुन्ह्यात सापडल्या. फुलेवाडी येथील एका बोगस डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे उघडकीस आले. जुना बुधवार पेठेतील एका घरात सोनोग्राफी मशीन मिळाले.
क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत स्वप्निल केरबा पाटील हा बोगस डॉक्टर सापडला. याशिवाय राधानगरी, मुरगुड, कोडोली येथेही कारवाया झाल्या. मात्र, गर्भपाताचे अड्डे बंद झाले नाहीत. उलट गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करण्याचे दर वाढले. यातून अनेक एजंट आणि डॉक्टरांचे उखळ पांढरे झाले आहे.
मलकापुरातील डॉक्टर पुन्हा सक्रिय
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे एका डॉक्टरवर दीड वर्षांपूर्वी कारवाई झाली होती. त्यावेळी त्याचा परवाना रद्द करण्यात आला. आता तो राजकीय ताकद वापरून पुन्हा परवाना मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय सेवेचा परवाना नसतानाही तो दुसऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयात बसून गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे काम करीत असल्याची माहिती परिसरातून मिळाली.
पट्टणकोडोलीत महिला डॉक्टरकडून गर्भपात
पट्टाणकोडोली येथे एक महिला डॉक्टर गर्भपाताचा अड्डा चालवते. तिच्याकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातून आणि सीमाभागातून रोज १० ते १५ रुग्ण येतात. त्यांच्याकडून गर्भपातासाठी ४० ते ५० हजार रुपये घेतले जातात. अनेक डॉक्टरांचाही या रॅकेटमध्ये सहभाग आहे.
गर्भपातानंतर विल्हेवाट
गर्भपात केल्यानंतर हॉस्पिटलकडून मृत अर्भकांची वैद्यकीय कचऱ्यातून विल्हेवाट लावली जाते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मागणी असल्यास अर्भक त्यांच्याकडे सोपवले जाते. त्यांच्याकडून ते शेतात दफन केले जाते.. असे सांगणाऱ्या मलकापुरातील एका डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. असे डॉक्टर वैद्यकीय पेशाला कलंक लावत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.