कोल्हापुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांत नाराजी, गटबांधणीचे सतेज पाटील यांच्या समोर आव्हान  

By भारत चव्हाण | Updated: May 8, 2025 13:31 IST2025-05-08T13:31:08+5:302025-05-08T13:31:32+5:30

बैठका, स्नेहभोजनाच्या निमित्ताने एकत्र येण्याचे प्रयत्न

Discontent among former Congress corporators in Kolhapur, challenge to Satej Patil to form a group | कोल्हापुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांत नाराजी, गटबांधणीचे सतेज पाटील यांच्या समोर आव्हान  

कोल्हापुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांत नाराजी, गटबांधणीचे सतेज पाटील यांच्या समोर आव्हान  

भारत चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची यावरून माजी नगरसेवकांत रंगलेल्या नाराजीनाट्याचे सूर अजूनही गुंजत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना ३० हून अधिक माजी नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आमदार सतेज पाटील यांच्या समोर आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी दोन-चार दिवसात स्नेहभोजनाचे आयोजन केले जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात बराच वाद झाला होता. पक्षाने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली; पण त्यांच्या नावाला बहुतांशी माजी नगरसेवकांनी जाहीर विरोध केला. त्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. पण लाटकर यांनी बंडखोरी केल्यामुळे मधुरिमांनी ऐनवेळी माघार घेतली. काँग्रेसची नाचक्की झाल्यानंतर शेवटी लाटकर यांनाच अपक्ष म्हणून पुरस्कृत करावे लागले. त्यामुळे काँग्रेस पक्षात अधिकच नाराजी निर्माण झाली. पक्षातील धुसफूस अद्यापही सुरूच आहे.

काँग्रेस पक्षाचे गट नेते शारंगधर देशमुख हेच महापालिकेतील सर्व कारभार पहात होते. त्यामुळे त्यांच्यातील नाराजी हेरून शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते देशमुख यांच्याशी संधान बांधून आहेत. देशमुख यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या दहा पंधरा माजी नगरसेवकांना सोबत घेऊन आपल्या पक्षात यावे, अशी खुली ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरमुळे देशमुख यांची द्विधा मन:स्थिती होणे साहजिकच आहे.

माजी नगरसेवकांतील नाराजी, देशमुख यांच्याकडे आलेली खुली ऑफर या पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची कळंबा येथील हॉटेलवर बैठक तसेच स्नेहभोजन पार पडले. बैठकीला ३० माजी नगरसेवक उपस्थित होते. फक्त शारंगधर देशमुख व माजी महापौर निलोफर आजरेकर उपस्थित नव्हत्या. शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीत शिवसेना शिंदे गटात जाण्याची कोणतीही चर्चा झाली नाही. पण आमदार सतेज पाटील यांच्यासोबत ठाम राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच दोन-चार दिवसात आमदार पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या समवेत एक बैठक व स्नेहभोजन आयोजित केले जाणार आहे.

देशमुख यांनाही ऑफर

येतील तेवढ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना घेऊन शारंगधर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात यावे. शिंदेसेनेचे गटनेते म्हणून काम करावे, शहर विकासासाठी लागेल तेवढा विकास निधी देण्यात येईल, त्यांनी सांगेल त्याप्रमाणे पदांचे वाटप केले जाईल, अशी ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. अशीच ऑफर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही देण्यात आली आहे. परंतु आजच्या घडीस काही अपवाद वगळता फारसा प्रतिसाद मिळेल, असे दिसत नाही.

Web Title: Discontent among former Congress corporators in Kolhapur, challenge to Satej Patil to form a group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.