धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:12 IST2025-06-02T13:11:54+5:302025-06-02T13:12:48+5:30

वासाच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये वाढीव दर

Dhananjay Mahadik raised the issue of Gokul deposit along with the issue of milk; Executive Director gave the investment and deposit figures | धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांत पारदर्शक व दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करत असताना ‘गोकुळ’च्या गुंतवणूक व ठेवींमध्ये १९० कोटींची वाढ करत हा टप्पा ५१२ कोटीपर्यंत पोहोचल्याची माहिती ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी पत्रकातून दिली. वासाच्या गाय दुधाला प्रतिलिटर ४ तर म्हैस दुधाला ६ रुपये देत असून पूर्वीपेक्षा वाढीव दोन व तीन रुपये दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा शनिवारी उपस्थित केला होता. त्यावर ‘गोकुळ’ प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे.

डॉ. गोडबोले म्हणाले, केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड कायद्यानुसार वासाचे अथवा भेसळयुक्त दूध हे बाजारात विक्रीस पुन्हा येऊ नये म्हणून नष्ट करणे बंधनकारक आहे. संघाने केवळ कायदा बघितला नाही, तर उत्पादकांचे आर्थिक हित केंद्रस्थानी ठेवून त्याला योग्य मोबदला देत आहोत. संघाच्या आगामी सर्वसाधारण सभेत यावर आणखी चर्चा करून दरवाढ करण्याचाही विचार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच घटकांच्या सहकार्यामुळे गुंतवणूक, ठेवीसह सर्वच पातळीवर आपण चांगले काम करू शकलो.

चार वर्षांत प्रतिदिनी ३.७२ लाख लिटरची वाढ

चार वर्षांपूर्वी रोज सरासरी १२.२२ लाख लिटर दूध संकलन होते. गेल्या चार वर्षात प्रतिदिनी ३.७२ लाख लिटरची वाढ झाल्याने आता १५.९४ लाख लिटरवर संकलन पोहोचले आहे. संघाच्या यशात जुन्या दूध संस्थांचा मोलाचा वाटा आहेच, त्याचबरोबर मागणी व दूध प्रक्रिया क्षमता, शेतकरी हित लक्षात घेऊनच नवीन संस्थांचा समावेश केल्याचे डॉ. गोडबोले यांनी म्हटले आहे.

म्हशीला १२ तर गायीला ९ रुपयांची वाढ

गेल्या चार वर्षांत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये म्हैस दुधाला प्रतिलिटर बारा तर गाय दुधाला नऊ रुपयांची वाढ केल्याचे डॉ. गोडबोले यांनी म्हटले आहे.

Web Title: Dhananjay Mahadik raised the issue of Gokul deposit along with the issue of milk; Executive Director gave the investment and deposit figures