Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:54 PM2021-07-30T15:54:50+5:302021-07-30T15:54:54+5:30

Kolhapur flood: आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते.

devendra fadnavis address media in kolhapur and demand loan waiver of flood affected area | Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा'

Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा'

Next
ठळक मुद्दे'मी पॅकेज जाहीर करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे'


कोल्हापूर: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहे. आज शाहुपुरीतील चौकात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. काही मिनिटं दोघांनी संवादही साधला. दरम्यान, या पाहणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे.

कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि मी तीन दिवसांचा दौरा केला. चंद्रकांत पाटीलही आमच्या दौऱ्यात जॉईन झाले. तीन जिल्ह्यात 22 ठिकाणी आम्ही भेट देऊन संवाद साधला. दरड कोसळली, भूस्खलन झालं, घरांमध्ये पाणी गेलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सामान्य माणसांच्या हालअपेष्टा अडचणी समजून घेतल्या, अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच, आम्ही मागच्यावेळी पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं. तसा निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्तांना सरकार 50 हजार देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेलं नाही. सरकारने ही मदत तातडीने दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सरकारने तातडीने मदत करावी
फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. लोक आमच्याजवल सातत्याने 2019 च्या मदतीचा उल्लेख करत होते. आमच्या सरकारने ते दिलं होतं. आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. अंतर्वस्त्रापर्यंत आणावं लागतं. ही जी तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी, असंही ते म्हणाले.

मी पॅकेज जाहीर करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शाहुपुरीत पूरबाधितांशी आत्मियतेने संवाद साधला. घाबरू नका, काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री पूरग्रस्तांना दिला. तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे. हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मी फक्त पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की, मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.
 

Read in English

Web Title: devendra fadnavis address media in kolhapur and demand loan waiver of flood affected area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app