कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा १,४९६, जोतिबाचा २६० कोटींचा विकास आराखडा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:42 IST2025-05-07T12:41:50+5:302025-05-07T12:42:38+5:30
चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा १,४९६, जोतिबाचा २६० कोटींचा विकास आराखडा मंजूर
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या अंबाबाई मंदिराच्या १,४९६ कोटी आणि जोतिबा मंदिर विकासाच्या २६० कोटी रुपयांच्या आराखड्याला अहिल्यानंतर जिल्ह्यातील चौंडी येथे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेली अनेक वर्षे या दोन्ही प्रमुख देवस्थानांच्या विकासाचा मुद्दा चर्चेत होता. अंबाबाईचा विकास आराखडा तर टप्प्याटप्प्यानेच तयार करण्यात आला. परंतु यामध्ये एकजिनसीपणा नव्हता. परंतु गेल्या दोन वर्षात हा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आणि तो सर्व त्रुटी काढून मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला. याची पूर्वतयारी म्हणून अंबाबाई मंदिर परिसरातील संभाव्य विस्थापितांच्या बैठकाही जिल्हा प्रशासनाने घेतल्या होत्या.
दुसरीकडे आमदार विनय कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे जोतिबा देवस्थानच्या विकासाचा आराखडाही तयार झाला. याबाबतचे प्राधिकरणच स्थापन करण्यात आले असून आता याही कामाला गती येणार आहे. प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या दोन्ही आराखड्यांबाबत प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातले. परिणामी चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत या विकास आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम उपस्थित होते.
अंबाबाई विकास आराखड्यात या बाबींचा समावेश
- मंदिराची दुरुस्ती व संवर्धन
- किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन
- मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन
- दर्शनासाठी अच्छादित मंडप
- स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
- लॉकर्स, शू स्टँड
- भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा’ म्हणून विकास
जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात या बाबींचा समावेश
- श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन
- पायवाटांचे जतन
- कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन
- भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र
- अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती
- घनकचरा व सांडपाणी प्रकल्प
- केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण
- यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास
साडेतीन पीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराच्या आणि दख्खनचा राजा जोतिबा विकास आराखड्यास मंजुरी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व विकास कार्याला गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंदिरांसाठी सखोल अभ्यास करून आवश्यक व प्राधान्य कामांचा समावेश करत उपयुक्त आराखडा तयार केला आहे. जगभरातील भाविकांसाठी ही आनंदाची बाब आहे. - प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर