IndiGo: कोल्हापूर विमानतळावर उड्डाणे वेळेत, दरही आवाक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:22 IST2025-12-09T17:15:45+5:302025-12-09T17:22:37+5:30
विमानांचे दर अव्वाच्या सव्वा लावल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप

संग्रहित छाया
कोल्हापूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून इंडिगो कंपनीच्या विमानसेवेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाल्याने त्याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानांचे दर अव्वाच्या सव्वा लावल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, कोल्हापूरविमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सर्वच विमान कंपन्यांचे दर नियमित दरासारखेच होते. यात एकही रुपयाची वाढ केली नसल्याने प्रवाशांना विनासायास प्रवास करता आला.
कोल्हापूर विमानतळावरून रोज ५०० प्रवाशांची ये-जा होते. या विमानतळावरून मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, अहमदाबाद या मार्गांवर सेवा दिली जाते. आठवड्यातून चार दिवस चार, तर तीन दिवस रोज विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होते. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील प्रवासीही मुंबईला जाण्यासाठी याच विमानतळावर येतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत या विमानतळावरून लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे. तीन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत कोल्हापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी इंडिगो कंपनीची सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसला. मात्र, रविवारपासून येथील सर्वच विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग वेळेत झाले आहे. कोल्हापूर ते मुंबई या प्रवासासाठी चार हजारांपासून पुढे सात-आठ हजार रुपयांपर्यंतचे तिकीट दर आहे. इंडिगोच्या सेवेमुळे देशभरात अनेक ठिकाणी विमान कंपन्यांनी त्यांच्या नियमित दरापेक्षा वाढ केली. मात्र, कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-बंगळुरू, कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर जाण्यासाठी पूर्वी जितके तिकिटाचे दर होते, तेच दर या काळातही कायम ठेवण्यात आले आहेत.
कोल्हापूर विमानतळावरील विमानांचे नियोजन रविवारपासून सुरळीत सुरू आहे. विमानतळ प्राधिकरणने घालून दिलेल्या नियमानुसारच तिकिटाचे दर आहेत. यात एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. -अनिल शिंदे, संचालक, विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर.