Kolhapur: डिबेंचरप्रश्नी उद्या ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:56 IST2025-10-15T11:56:21+5:302025-10-15T11:56:38+5:30
प्रशासनाला वस्तुस्थिती पटवून देऊनही दखल घेतलेली नाही

Kolhapur: डिबेंचरप्रश्नी उद्या ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने डिबेंचरपोटी कपात केलेल्या रकमेने संस्था अडचणीत आल्या असून, संघ प्रशासनाला वस्तुस्थिती पटवून देऊनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भेट घेणार असून, गुरुवारी जनावरांसह ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती कावणे (ता. करवीर) येथील केदारलिंग दूध संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील व भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
उद्या, सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहापासून ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रवीण पाटील म्हणाले, संघाने दूध दर फरकातून डिबेंचरपोटी यंदा मोठी कपात केल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. संघाने मोठे आकडे जाहीर केले आणि प्रत्यक्षात कमी रक्कम जमा केली. आता दूध उत्पादकांना वाटप काय करायचे? ‘गोकुळ’ प्रशासनाने संस्थांची फसवणूक केली आहे. याबाबत, दुग्ध विभागाकडेही तक्रार करणार असून, यामध्ये संघाचे संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते. अजूनही संघ व्यवस्थापनाने नियमात बसवून डिबेंचर परत द्यावा. यावेळी, युवराज पाटील (कणेरी), प्रमोद पाटील, बाबासाहेब साळोखे (कोतोली), सर्जेराव धनवडे (गडमुडशिंगी), प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
डिबेंचर कपातीमुळे दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. जिल्ह्यातील संस्थांच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली. त्यांच्या मागण्या रास्त असल्याने उद्या, त्यांच्या सोबत दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी मोर्चा नव्हे निवेदन घेऊन ‘गोकुळ’ प्रशासनाची भेट घेणार आहे. - शौमिका महाडिक संचालिका, ‘गोकुळ’