सतीश पाटीलशिरोली : महामार्ग आणि कोल्हापूर शहरातून दररोज धावणारी ५० हजार वाहने, रस्त्यांचे अपुरे काम, तावडे हॉटेल चौकात अपुरी जागा यामुळे कोल्हापूर शहर व परिसरातील रस्त्यांवरील दररोजची वाहतूककोंडी आता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.शहरातून शिरोली सांगली फाटा, शिरोली सांगली फाट्याहून कोल्हापूरकडे येणे, तसेच गांधीनगर ते कोल्हापूर आणि उचगाव सांगली फाटा हे अल्प अंतर गाठण्यासाठी तब्बल दीड तास लागत आहेत. रोजच्या प्रवासात तीन ते चार किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी एवढा वेळ लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.शहरात आणि महामार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, कोल्हापूर शहरात येण्यासाठी अपुरी रस्त्यांची रुंदी, रस्त्यांवरील ठिकठिकाणी सुरू असलेले काम, यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सकाळी ऑफिस, शाळा व महाविद्यालयांची वेळ आणि संध्याकाळी परतीच्या वेळेस वाहतुकीवरचा ताण प्रचंड वाढतो. विशेषतः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महामार्गाशी जोडलेल्या शिरोली सांगली फाटा, उचगाव येथे वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा लागतात. रुग्णालयात जाणारे रुग्ण, शाळेत जाणारी लहान मुले, नोकरी-व्यवसायासाठी रोज प्रवास करणारे नागरिक हे या कोंडीमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल येथे सिग्नल व्यवस्था उभारली असली तरी याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १५ ते २४ हजार वाहने गेल्या आठ दिवसांत धावली आहेत. सरासरी २० हजार वाहने रस्त्यांवर धावत असतात, असे राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल आणि महामार्गावर दररोज २५ ते ३० हजार वाहने धावतात. तावडे हॉटेल चौकात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखा, महामार्ग, शिरोली, गांधीनगर पोलिस, असे एकूण २५ कर्मचारी गेली तीन दिवस तैनात आहेत. - नंदकुमार मोरे, शहर वाहतूक निरीक्षक
कोल्हापूर शहरात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाहनचालकांना तास तासभर ताटकळत बसावे लागते. तावडे हॉटेल चौकात आणि पंचगंगा नदी पुलावर होणारी वाहतूककोंडी याला कारणीभूत आहे. ही कोंडी सोडवणे आवश्यक आहे. - ज्योतीराम पोर्लेकर, जिल्हाध्यक्ष मानवाधिकार.