Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवितात, काहीजण अलगद जाळ्यात अडकतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:45 IST2025-12-19T12:45:11+5:302025-12-19T12:45:41+5:30
सायबर गुन्हेगारांकडून घातला जातो लाखोंचा गंडा

Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवितात, काहीजण अलगद जाळ्यात अडकतात
कोल्हापूर : आयुष्यात कधीच पोलिस आणि कोर्ट-कचेरीशी संबंध न आलेल्या लोकांना पोलिस ठाण्यातून फोन केल्याचे सांगताच ते घाबरतात. कधी त्यांचा विश्वास संपादन करून, तर कधी त्यांना अब्रुनुकसानीची भीती घालून लाखो रुपये उकळले जातात. सायबर गुन्हेगारांच्या चक्रव्यूहात अडकल्यानंतर अनेकजण त्यातून बाहेर पडण्यासाठी लाखो रुपये गमावतात. कोर्ट-कचेरीबद्दलची अनाठायी भीती आणि सायबर गुन्ह्यांच्या अज्ञानातून असे प्रकार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी सायबर सजगता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी, महिलांना लक्ष्य करून डिजिटल अरेस्टची भीती घातली जाते. तुमच्या आधारकार्डचा वापर मनी लॉड्रिंग, देशविघातक कारवाया, फसवणुकीसाठी झाल्याचे सांगितले जाते. कधी तुमच्या नावे पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याची भीती घातली जाते. बोलण्याच्या ओघात आधारकार्ड, बँक खाती, आर्थिक स्रोत, नातेवाईकांची माहिती काढली जाते. तसेच मोबाइल हॅक करून त्यातील फोन नंबर, फोटो यासह इतर महत्त्वाची माहिती चोरली जाते.
आयुष्यात कोणताही गुन्हा केला नसला तरी केवळ संशयाच्या भोवऱ्यात सापडून बदनामी होणार. अटक झाल्यास पोलिस कोठडीत जावे लागणार. नातेवाईक, पै-पाहुणे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार. या भीतीनेच नागरिकांकडून सायबर गुन्हेगारांच्या सूचनांचे पालन केले जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भीती घालून १५ कोटी उकळले
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात डिजिटल अरेस्टचे आठ गुन्हे दाखल झाले. सायबर गुन्हेगारांनी सुमारे १५ कोटी रुपये उकळले. यातील सुमारे ४५ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. त्यातील बहुतांश रक्कम फिर्यादींना परत मिळाली. उर्वरित रक्कम गुन्हेगारांनी पुढे देशभरातील अनेक खात्यांवर वर्ग केल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर सजगता हाच उपाय
सरकार आणि पोलिसांकडून सातत्याने सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. याबद्दल नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही. कोणत्याही पोलिसांना व्हिडिओ कॉल करून अटक करण्याचा अधिकार नसतो. असे मेसेज किंवा फोन आल्यास संबंधितांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.