पीक कर्जवाटपात कोल्हापूर पुणे विभागात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:04 IST2020-05-24T13:00:54+5:302020-05-24T13:04:08+5:30
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नाबार्ड जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देते. पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम असल्याने त्यांना एकूण वाटपापैकी ५० टक्के उद्दिष्ट दिले जाते.

पीक कर्जवाटपात कोल्हापूर पुणे विभागात पुढे
राजाराम लोंढे
कोल्हापूर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली असून, पीक कर्जाच्या मागणीतही वाढ होत आहे. राज्यातील बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाचे वाटप सुरू झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने प्रभावीपणे कर्जवाटप केले असून, पुणे विभागात कोल्हापूर पुढे राहिले आहे. जिल्ह्यासाठी १२४० कोटींचे उद्दिष्ट होते, त्यापैकी दीड महिन्यात तब्बल ५४५ कोटींचे वाटप करून जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात भात, भुईमूग, नागली, सोयाबीन, खरीप, ज्वारीसह कडधान्य व ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या पिकांना एप्रिलपासूनच पीक कर्जवाटप सुरू होते. साधारणत: सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्जवाटपाची मुदत असली तरी मे, जूनमध्येच बहुतांश शेतकरी कर्जाची उचल करतात. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नाबार्ड जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देते. पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम असल्याने त्यांना एकूण वाटपापैकी ५० टक्के उद्दिष्ट दिले जाते. गेल्या दोन महिन्यांत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकांनी विकास संस्थांच्या माध्यमातून एक लाख ७३ हजार ४५४ शेतकऱ्यांना ११३४ कोटी २९ लाखांचे पीक कर्ज दिले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनीही विभागातील साडेसहा हजार शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
केडीसीसीची कर्जवाटपात राज्यात आघाडी
पीककर्ज वाटपात पुणे विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँका नेहमीच पुढे असतात. त्यातही कोल्हापूूर जिल्हा मध्यवर्ती बँक (केडीसीसी) आघाडीवर असते. गेल्या खरीप हंगामात या बँकेने उद्दिष्टाच्या तुलनेत १६६ टक्के कर्जाचे वाटप केले होते. आतापर्यंतही तिने ७६ टक्के वाटप करून राज्यात आघाडी घेतली आहे.
२४ हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहणार
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी दोन लाख २४ हजार शेतकरी पीककर्जाची उचल करतात. मात्र यंदा महापूर, साखर कारखान्यांच्या प्रलंबित असणाऱ्या उसाच्या बिलांमुळे कसे तरी दोन लाख शेतकरीच कर्जासाठी पात्र ठरतील, असा अंदाज आहे.
लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणाम
सध्या सगळीकडेच लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा फटका कर्जवाटपास बसला आहे. गावे बंद असल्याने सचिवांना विकास संस्थेपर्यंत जाता येत नसल्याने कर्जपुरवठा थांबल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत.
- कोल्हापूर विभागातील पीक कर्जवाटप, कोटींत -
- जिल्हा उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप शेतकरी संख्या
- कोल्हापूर १२४०.११ ५४५.२६ ६५,३९०
- सांगली १५५७.०० २७७.१९ ४०,४१८
- सातारा २२७०.०० ३६९.६१ ७४,५२९
एकूण ५०६७.११ ११९२.०७ १,८०,३३७
पीक कर्जवाटपात कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची कर्जवाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
- राहुल माने (व्यवस्थापक, लीड बँक)