रोज सव्वा टक्का परताव्याचे आमिष, ३५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात ब्लॉक ऑरा, डॉक्सी फायनान्स कंपनीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:39 IST2023-10-06T12:37:16+5:302023-10-06T12:39:31+5:30
कंपनीचे प्रमुख पसार

रोज सव्वा टक्का परताव्याचे आमिष, ३५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात ब्लॉक ऑरा, डॉक्सी फायनान्स कंपनीवर गुन्हा
कोल्हापूर : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ट्रेडिंग कंपन्यांचे बिंग रोज फुटत असतानाच, शाहूपुरीतील ब्लॉक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स या कंपन्यांनी केलेली फसवणूक समोर आली आहे. या दोन्ही कंपन्यांनी रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. आनंदराव प्रकाश घोरपडे (रा. दत्तवाड, ता. शिरोळ) आणि अमोल विलासराव मोहिरे (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सागर दत्तात्रय कांबळे (वय २४, रा. तरसंबळे, ता. राधानगरी) यांनी फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ब्लॉक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख घोरपडे आणि मोहिरे हे दोघे फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादी सागर कांबळे यांच्या घरी गेले. गुंतवणुकीवर रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी पैसे भरण्यास भाग पाडले. तीन महिन्यात रक्कम करून दुप्पट मिळेल, असे सांगून जास्तीत जास्त पैसे भरण्यास सांगितले.
सुरुवातीला २० हजारांच्या गुंतवणुकीवर आठ हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर कांबळे यांनी चार लाख ८० हजार रुपये भरले. त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही. मुद्दल परत मिळावी, अशी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्यासारखीच इतर २१ जणांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी गेल्या महिन्यात राधानगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
संशयित पळाले
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच कंपनीचे प्रमुख आनंदराव घोरपडे आणि अमोल मोहिरे दोघेही गायब झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती राधानगरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.
४०० जणांना घडवली थायलंडची सहल
कंपनीत दहा लाखांवर पैसे गुंतवलेल्या ४०० जणांना संशयित मोहिरे याने ऑगस्ट २०२२ मध्ये थायलंडची सहल घडवली. शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन तो गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होता. सोशल मीडियातूनही त्याने दोन्ही कंपन्यांचे प्रमोशन केले.
डीटीपी ऑपरेटर ते कंपनीचा मालक
संशयित मोहरे याचे शाहूपुरीतील पाचव्या गल्लीत कार्यालय आहे. तिथे तो डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करीत होता. गुंतवणूक कंपन्या सुरू केल्यापासून त्याची जीवनशैली बदलली. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये त्याचा आलिशान बंगला आहे.