गुड न्यूज: दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थ्यांची थांबवली पायपीट, कोल्हापुरातील 'क्रिएटिव्ह टीचर्स फोरम'चे कार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:25 IST2025-01-01T15:22:28+5:302025-01-01T15:25:16+5:30
शिक्षण क्षेत्रातील हिरवळीचे बेट

गुड न्यूज: दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थ्यांची थांबवली पायपीट, कोल्हापुरातील 'क्रिएटिव्ह टीचर्स फोरम'चे कार्य
कोल्हापूर : ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले...’ शंकर रामाणी यांच्या या ओळी वाचल्या की, एक पणती अंधाराला नाहीसे करून मंद का असेना प्रकाश देण्याचे काम करते, असा आशावाद जागृत होतो. समाज चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींनी बनतो. समाजातील ही व्यामिश्रता सर्वच क्षेत्रांमध्ये असते. अर्थात शिक्षण क्षेत्र याला अपवाद नाही. अनेक समस्या, अडचणी शिक्षण क्षेत्रासमोर आहेत. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, पालक ते प्रशासन या सर्वांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत काही हिरवळीची बेटे धुंडाळावी लागतात. कोल्हापुरात शिक्षण क्षेत्रातील असे हिरवळीचे बेट दिसून येते. ते म्हणजे क्रिएटिव्ह टीचर्स फोरम अर्थात ध्येयवेड्या शिक्षकांचा समूह.
शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा या दुर्गम तालुक्यांतील शंभर मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मोफत सायकली वितरण करण्याच्या कल्पनेतून क्रिएटिव्ह टीचर्स फोरम निर्माण झाला. आज या फोरमने दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थ्यांची पायपीट थांबवली आहे. दीपक जगदाळे, संजय कळके, विजय एकशिंगे, चंद्रकांत निकाडे, प्रकाश ठाणेकर आदी ध्येयवादी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मिळून हे काम सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करत क्रिएटिव्ह टीचर्स फोरम विस्तारित झाला. आता शंभरहून अधिक कार्यकर्ते शिक्षक क्रिएटिव्ह टीचर्स फोरमचे सदस्य आहेत. हे सर्वजण आपापल्या स्तरावर छोटे-मोठे प्रयोग करतात. स्वतःचा वेळ देत व पदरमोड करून एकत्र येतात. ध्येयवेड्या शिक्षकांचा हा समूह डॉ. विश्वास सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रास सकारात्मकता देण्याचे काम करत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. जी. पी. माळी, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, डॉ. विश्वास सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिएटिव्ह टीचर्स फोरम करत असलेले विधायक उपक्रम समाजाला दिशादर्शी आणि मार्गदर्शक ठरणारे आहेत. ‘दृष्टी बदला, सृष्टी बदलेल’, असा संदेश हा ध्येयवादी समूह समाजाला देत आहेत.
फोरमच्या वतीने राबवले जाणारे उपक्रम
शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण, शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण, शिक्षकांची अभ्यास सहल, विद्यार्थ्यांना मोफत मोबाइल संच वितरण, शिक्षक संवाद कार्यशाळा, सर्व प्राथमिक शाळांना इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध प्रश्नसंच मोफत वितरण, वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मोफत वाचनीय पुस्तकांचे वितरण अशा उपक्रमांचे आयोजन फोरमने केले आहे.