Kolhapur Crime: बनावट युटीआर मेसेज करुन न्यायालय, कंपनीची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:17 IST2025-09-19T19:14:54+5:302025-09-19T19:17:35+5:30
सर्वच कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असूनदेखील ती न्यायालयात सादर केली

Kolhapur Crime: बनावट युटीआर मेसेज करुन न्यायालय, कंपनीची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : फायनान्स कंपनीशी तडजोड कर्जाची रक्कम भरल्याबाबतचा बनावट बँकेचा बनावट युटीआर मेसेज तयार करून सर्वोच्च न्यायालय आणि संबंधित वित्तीय कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दशरथ गणपती काळे व सूरज कणसे यांच्याविरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद भरत इंद्रसेन जयकर (वय ५५, रा. अंधेरीपूर्व मुंबई) यांनी दिली.
कुरुंदवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाने शाळेच्या कामासाठी ऑक्सिलो फिन्सर्व प्रा.लि. या कंपनीकडून कर्ज घेतले होते. कंपनी व चैतन्य संस्थेमध्ये थकीत कर्जाबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. कंपनीकडे कर्जाची तडजोड रक्कम म्हणून चैतन्य संस्था साडेचार कोटी रुपये भरणार होती. मात्र, केवळ ४० लाख रुपये इतकीच रक्कम भरण्यात आली. उर्वरित चार कोटी १० लाख रुपये थकीत रक्कम भरल्याचा बनावट बँकेचा बनावट युटीआर मेसेज तयार करून रक्कम भरल्याचे भासविले.
शिवाय कर्ज खाते बंद केल्याचा, सेटलमेंट पत्राचा ई मेल कंपनीच्या नावे बनावट पत्र तयार केले. तसेच फिर्यादी यांची खोटी स्वाक्षरीदेखील त्यावर केली. सर्वच कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असूनदेखील ती न्यायालयात सादर केली. सर्वोच्च न्यायालय व फायनान्स कंपनीची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर काळे व कणसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक झाली नव्हती.