फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक कोटीची फसवणूक; कोल्हापुरातील दाम्पत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:25 IST2025-04-02T12:25:04+5:302025-04-02T12:25:24+5:30
सात जणांची फसवणूक, १५ टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक कोटीची फसवणूक; कोल्हापुरातील दाम्पत्यास अटक
कोल्हापूर : फॉरेक्स शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा दहा आणि पंधरा टक्के परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ६५ हजारांची फसवणूकप्रकरणी येथील जिवबा नाना जाधव पार्कमधील दाम्पत्यास करवीर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
सागर मारुती माने, स्नेहल सागर माने (रा. सादगी बंगलो, कारदगे हिल्स, जिवबा नाना पार्क, कोल्हापूर) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सुनील मनोहर आंबेकर (वय ५४, रा. महालक्ष्मी पार्क, रिंगरोड, फुलेवाडी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, माने दाम्पत्याने सादगी सेल्स अँड सर्व्हिसेस इन्वेस्टमेंट या नावाने आपल्या जिवबा नाना पार्क येथील घरात फर्म काढली होती. फॉरेक्स शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जानेवारी २०२२ ते १६ जुलै २०२३ या कालावधीत शहरासह जिल्ह्याबाहेरच्या गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून घेतले. ९० हजारांपासून ते ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले.
मुदत संपल्यानंतर लोक पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी आज, उद्या अशा प्रकारे टाळाटाळ सुरू केली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी करवीर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेतली.
दरम्यान, आंबेकर यांच्या फिर्यादीवरून माने दाम्पत्यावर ३१ मार्च २०२५ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने त्यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गुंतवणूकदारांची नावे आणि रक्कम अशी
सुनील मनोहर आंबेकर : २९ लाख ८० हजार
संपूर्णा चंद्रकांत बेलेकर (रा. कोल्हापूर) : २५ लाख २७ हजार
संदेश चंद्रकांत बेलेकर (रा. हनुमाननगर) : ९० हजार रुपये
रवींद्र कृष्णा माळगे (रा. पाचगाव) ९ लाख रुपये
सुनील मुकुंद मोरे (रा. शिवाजीपेठे) ५ लाख ८६ हजार
राहुल आनंदराव भोसले (पाचगाव) १६ लाख ६१ हजार
संजय सदाशिव चव्हाण (रा. गिरगाव) : १३ लाख २० हजार
शंभरावर लोकांची फसवणूक
दाम्पत्याने १०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे; पण अनेक पुढे येत नाहीत. गुंतवणूक करून फसवणूक करणारा सागर माने याचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील अडकूर आहे, असे फिर्यादी आंबेकर यांनी सांगितले.