लाखाच्या बदल्यात द्यायचे ३ लाखांच्या बनावट नोटा, सूत्रधार ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख; कोल्हापुरात रॅकेटचा पर्दाफाश

By उद्धव गोडसे | Published: January 8, 2024 06:43 PM2024-01-08T18:43:17+5:302024-01-08T18:43:35+5:30

छापा टाकून महिलेसह तिघांना अटक

Counterfeit notes of 3 lakhs to be given in lieu of lakhs, Three arrested in Kolhapur | लाखाच्या बदल्यात द्यायचे ३ लाखांच्या बनावट नोटा, सूत्रधार ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख; कोल्हापुरात रॅकेटचा पर्दाफाश

लाखाच्या बदल्यात द्यायचे ३ लाखांच्या बनावट नोटा, सूत्रधार ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख; कोल्हापुरात रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर : तीन पट बनावट नोटा छापून देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणा-या आंतरराज्यीय रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना पोलिसांनी अटक केले.

त्यांच्याकडून एक लाखाची रोकड आणि नोटा छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई रविवारी (दि. ७) बेलवळे खुर्द येथील फार्महाऊसवर छापा टाकून केली. टोळीचा सूत्रधार पाटील हा शिवसेनेचा (उबाठा) तालुका प्रमुख आहे. तिघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तुकाराम शेळके (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांना एक लाख रुपयांच्या ख-या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष एका टोळीने दाखवले होते. याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संबंधित टोळीवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या.

त्यानुसार पोलिसांनी रविवारी संशयित अशोक पाटील याच्या बेलवळे खुर्द येथील फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी मेहरूम सरकवास आणि सलील सय्यद हे दोघे उमेश शेळके यांना बनावट नोटा छपाईचे प्रात्यक्षिक दाखवत होते. पोलिसांनी फार्महाऊसचा मालक पाटील याच्यासह बनावट नोटांचे रॅकेट चालवणारे सरकवास आणि सय्यद या तिघांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून लाखाची रोकड, प्रिंटर, बनावट नोटांसाठी वापरले जाणारे कोरे कागद, काचेच्या पट्ट्या, रसायन जप्त केले.

अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. पुढील तपास कागल पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह संतोष पाटील, हिंदुराव केसरे, समीर कांबळे, तुकाराम राजिगरे, ओंकार परब, सुशील पाटील, सुप्रिया कात्रट यांनी कारवाई केली.

Web Title: Counterfeit notes of 3 lakhs to be given in lieu of lakhs, Three arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.