CoronaVirus Lockdown :तब्बल दोन महिन्यांनी शहर पूर्वपदावर, व्यवहार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:38 IST2020-05-22T19:37:46+5:302020-05-22T19:38:55+5:30
लॉकडाऊन जाहीर झाल्याला शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले, हा योग साधून काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून मिळाल्याने शुक्रवारी खऱ्या अर्थाने शहर पूर्वपदावर आले.

CoronaVirus Lockdown :तब्बल दोन महिन्यांनी शहर पूर्वपदावर, व्यवहार सुरू
कोल्हापूर: लॉकडाऊन जाहीर झाल्याला शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले, हा योग साधून काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून मिळाल्याने शुक्रवारी खऱ्या अर्थाने शहर पूर्वपदावर आले.
सम-विषमची संभ्रमावस्था झाल्याने काही दुकाने बंदच राहिली असली तरी उघडलेली दुकाने, रस्त्यावरची वाढलेली वर्दळ आणि सुरू झालेले व्यवहार पाहून विक्रेत्यांसह खरेदी करणाऱ्यांचे चेहरेही उमलले.
गेल्या २२ मार्चपासून देशभर संचारबंदी आणि त्यापाठोपाठ लॉकडाऊनही जाहीर झाला आणि एखाद दिवशी बंद असणारी दुकाने तब्बल दोन महिने कुलूपबंद राहिली. जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने बंदच राहिल्याने संपूर्ण अर्थचक्रच कोलमडले होते.
शुक्रवारी लॉकडाऊन शिथिल झाल्याने शुक्रवारी या सर्व दुकानांचे कुलूप उघडले गेले आणि खऱ्या अर्थाने या लॉकडाऊनमुळे आलेली मरसळ झटकली गेली. मोठमोठी शॉपिंग मॉल्स, मोठी दुकाने वगळता लहान दुकाने बऱ्यापैकी उघडली गेली.
इलेक्ट्रीक दुकानांपासून ते खेळण्यापर्यंत, मोबाईलपासून शेगड्यापर्यंत आणि नवीन कपड्यासह टेलरपर्यंतची सर्व दुकाने खुली झाली. ९ ते ५ यावेळेतच व्यवसाय करण्याची मुभा दिल्याने वेळेवरून काही नाराजी असली तरी दुकाने सुरू झाल्याचा आनंद त्यापेक्षा कैकपटीने अधिक होता.