कोरोनाने माझा गुलाबाचा गुच्छ हिरावून नेला... राजू शेट्टी झाले भावूक : जिवाभावाच्या साथीदाराचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST2021-05-18T04:26:25+5:302021-05-18T04:26:25+5:30

कोल्हापूर : माझ्या जिव्हाळ्याची माणसं एकापाठोपाठ एक घेण्याचा सपाटाच कोरोनाने लावलेला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये देशाचे माजी कृषिमंत्री चौधरी अजित ...

Corona took away my bouquet of roses ... Raju Shetty became emotional: Jivabhav's partner dies | कोरोनाने माझा गुलाबाचा गुच्छ हिरावून नेला... राजू शेट्टी झाले भावूक : जिवाभावाच्या साथीदाराचे निधन

कोरोनाने माझा गुलाबाचा गुच्छ हिरावून नेला... राजू शेट्टी झाले भावूक : जिवाभावाच्या साथीदाराचे निधन

कोल्हापूर : माझ्या जिव्हाळ्याची माणसं एकापाठोपाठ एक घेण्याचा सपाटाच कोरोनाने लावलेला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये देशाचे माजी कृषिमंत्री चौधरी अजित सिंग आणि कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक यांच्या श्रद्धांजलीची पोस्ट लिहिली आणि बाळासाहेब चौगुले एका रांगड्या शेतकरी कार्यकर्त्यावर श्रद्धांजलीची पोस्ट लिहिण्याची वेळ आल्याचे सांगत, राजू शेट्टीं यांनी सोमवारी त्यांचा हाडाचा कार्यकर्ता गमावल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. गुलाबाची शेती करणारे बाळासाहेब चौगुले हे शेट्टी यांना रोज गुलाबाचा गुच्छ देत असत. त्यांच्या निधनाने हा गुच्छ आता कायमचा लुप्त झाला.

शेट्टी म्हणतात, हेरवाड (ता. शिरोळ)चे बाळासाहेब चौगुले यांचे कोरोनाने निधन झाले. शेतकरी गडी रांगडा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशीच ती त्यांची बुलेट, रोज सकाळी साडेपाचला मला त्या बुलेटचं आणि बाळासाहेबांचं दर्शन घडायचं, मी फिरायला बाहेर पडलो की, नेमकं त्याच वेळी बाळासाहेब बुलेटवरून गुलाबाची फुले घेऊन मिरज मार्केटला जायला निघायचे. रस्त्यात मी भेटणार, हे माहीत असल्यामुळे हमखास माझ्यासाठी चार-पाच गुलाब एकत्र करून एक गुच्छ तयार करून घेऊन यायचे आणि तो माझ्या हातात दिल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. एखाद्या वेळेस मी बाहेरगावी गेलो असलो तरी, न चुकता हा गुच्छ आमच्या घरी पोहोचत असे. असे हे बाळासाहेब संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते. संघटनेचं कोणतंही आंदोलन किंवा मोर्चा असो किंवा अजून काही उपक्रम असो, पहिल्या फळीत असायचे. एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देता-देता हरला आणि मी जिवाभावाचा साथीदार गमावला. अशा या सवंगड्याला भावपूर्ण श्रद्धांजली!

फोटो : १७०५२०२१-कोल-राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना रोज न चुकता गुलाबाचा गुच्छ देणारे हेरवाड (ता. शिरोळ) चे शेतकरी बाळासाहेब चौगुले यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले. त्यामुळे रोज सकाळी होणारी ही प्रेमळ भेट आता कायमची दुरावली.

Web Title: Corona took away my bouquet of roses ... Raju Shetty became emotional: Jivabhav's partner dies