Kolhapur: शिरोळमध्ये ऊस वाहतुकीवरून अंकुश-कारखाना समर्थकांत वादावादी, तणावपूर्ण परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:47 IST2025-11-01T11:46:43+5:302025-11-01T11:47:27+5:30
आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत घालवाड फाटा येथे ठिय्या मारला

Kolhapur: शिरोळमध्ये ऊस वाहतुकीवरून अंकुश-कारखाना समर्थकांत वादावादी, तणावपूर्ण परिस्थिती
शिरोळ : ऊसदरप्रश्नी आंदोलन अंकुशने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत रात्री आठच्या सुमारास शिरोळ येथून निघालेली ऊस वाहतूक अडवली. कोणत्याही परिस्थितीत वाहने सोडणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी कारखाना समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत घालवाड फाटा येथे ठिय्या मारला होता.
चालू गळीत हंगामात पहिली उचल ४ हजार रुपये व मागील हंगामातील २०० रुपये मिळावेत, यासाठी आंदोलन अंकुशने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. विविध संघटनांकडूनही आंदोलने सुरू आहेत. साखर कारखान्यांकडून जाहीर झालेला दर अमान्य करीत अंकुशने आंदोलन पुढे सुरू ठेवले आहे. शुक्रवारी अर्जुनवाड येथे सुरू असलेल्या ऊसतोडी कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या. कर्नाटक राज्यात जाणारी उसाची वाहने परत पाठविण्यात आली, तर रात्री शिरोळ येथील शिवाजी चौकातून दत्त कारखान्याकडे निघालेली उसाची वाहने अडविण्यात आली.
यावेळी चुडमुंगे यांच्यासह अकुंशच्या कार्यकर्ते व कारखाना समर्थक यांच्यात ऊस वाहतुकीवरून जोरदार वादावादी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, चुडमुंगे यांनी शिरोळ येथील घालवाड फाटा येथे ऊस वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर ठिय्या मांडला, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते रस्त्यावर बसून होते. यावेळी शिरोळ पोलिस ठाण्यामार्फत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धनाजी चुडमुंगे यांना मारहाण केल्याचा आरोप यावेळी अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केला, तर कारखाना समर्थक नीलेश गावडे म्हणाले, कारखान्याने ३४०० रुपये ऊसाचा दर जाहीर केला आहे. हा दर ज्या शेतकऱ्यांना परवडतो त्यांनी तोडी घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा ऊस कारखान्याला येत आहे. त्यामुळे शेतकरी व कारखान्याचे नुकसान करू नका, असे सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो. यावेळी बाचाबाची झाली असल्याचे त्यांनी सांगितले.