slab collapses case: चूक ठेकेदाराची, दोष अभियंत्यांवर; कोल्हापूर महापालिकेत अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:25 IST2025-10-07T13:24:44+5:302025-10-07T13:25:20+5:30
कर्मचारी संघ पदाधिकाऱ्यांसह अभियंते प्रशासकांना भेटणार

slab collapses case: चूक ठेकेदाराची, दोष अभियंत्यांवर; कोल्हापूर महापालिकेत अस्वस्थता
कोल्हापूर : फुलेवाडी येथील अग्निशमन दलाच्या निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी प्रशासनाने एका अभियंत्याला निलंबित करून अन्य दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे महापालिकेतील सर्वच अभियंते भीतीच्या छायेखाली वावरताना पाहायला मिळत आहेत. ठेकेदाराची चूक व निष्काळजीपणामुळे अपघात घडला, पण त्याबद्दल महापालिका अभियंत्यांना दोषी का ठरवले जात आहे? असा सुप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या आठवड्यात फुलेवाडी येथे अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक कर्मचारी मृत झाला तर अन्य चौघे जखमी झाले. ही घटना निष्काळजीपणामुळे घडली आणि त्याची शिक्षा मात्र आपल्याला भोगावी लागत असल्याची भावना महापालिकेतील अभियंत्यांच्या मनात तयार झाल्याने ते कमालीचे अस्वस्थ आहेत.
महापालिकेकडे पुरेसे अभियंते, कर्मचारी नाहीत म्हणून अग्निशमन दलाच्या इमारतीच्या बांधकामाचा ठेका देण्यात आला होता. निविदेतील निकषाप्रमाणे इमारत बांधण्याची तसेच पुरेशी खबरदारी घेण्याची जबाबदारी ठेकेदाराची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची होती. ज्या दिवशी स्लॅब टाकायचा होता, त्या दिवशी सकाळी स्ट्रक्चरल इंजिनिअर, महापालिकेचे अभियंता प्रमोद बराले यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती, अशी माहिती समोर येत आहे.
सकाळी ११ वाजता स्लॅब टाकण्याचे काम सुरू होणार होते आणि दिवसा उजेडी ते संपवायचे होते. परंतु, ठेकेदाराने ते सायंकाळी सुरू केले. वीस फुटावरील स्लॅब असेल तर रात्रीचे काम करायचे नसते, असा नियम आहे. तरीही ठेकेदाराने रात्री १० वाजेपर्यंत काम संपवण्याचा घाट घातला आणि शेवटच्या टप्प्यात मालवाहू लिफ्ट बीमला ठोकरून अपघात झाला.
ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे एखादा अपघात झाला तर त्याला मनपाचे अभियंते दोषी कसे? असा प्रश्न आता पालिकेतील सर्वच अभियंत्यांना सतावू लागला आहे. त्यामुळेच ते भीतीच्या छायेखाली काम करताना दिसत आहेत. या अस्वस्थतेतूनच सोमवारी सर्व अभियंते महापालिकेत जमले होते. त्यांनी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
चूक नसताना जबाबदार धरले जाणार असेल तर काम कसे करायचे, अशी हतबलताही या चर्चेतून दिसून आली. कर्मचारी संघाने अभियंत्यांच्या पाठीशी राहावे, अशी विनंती अभियंत्यांनी केली. त्यानुसार प्रमोद बराले यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी लवकरच कर्मचारी संघाचे पदाधिकारी आणि सर्व अभियंते प्रशासकांना भेटणार आहेत.
कारवाईत राजकीय प्रभाव तर नाही?
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीत अधिकाऱ्यांकडून बरेच खुलासे दिले गेले. तरीही पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले. त्यामुळे दुखावलेल्या लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर डाव काढला नसेल ना? अशी शंका उपस्थित होत आहे.