कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकाम, वृक्षतोडीला स्थगिती; सर्किट बेंचचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:02 IST2025-11-26T12:01:36+5:302025-11-26T12:02:00+5:30
पुढील सुनावणी १८ डिसेंबरला

कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकाम, वृक्षतोडीला स्थगिती; सर्किट बेंचचा निर्णय
कोल्हापूर : राजाराम तलाव येथे बांधण्यात येत असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम व वृक्षतोड तातडीने थांबवण्याचा आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर यांनी दिला. येथील वृक्षताेडीविरोधात परिसरातील वृक्षप्रेमी व सामाजिक संघटनांनी याचिका दाखल केली होती. पुढील सुनावणी १८ डिसेंबरला आहे.
राजाराम तलाव येथे कन्व्हेन्शन सेंटर उभारले जात असून त्यासाठी याआधीच अनेक झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली आहे. उर्वरित ११५ झाडे तोडण्यासाठी महापालिकेने १६ सप्टेंबरला नोटीस प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या. त्यावर वृक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून वृक्षतोडीला विरोध केला होता. मात्र त्यावर महापालिकेने कार्यवाही न केल्याने वृक्षप्रेमी व सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. तसेच आधी झालेल्या वृक्षतोडीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मात्र त्यांच्याकडूनही या मागणीवर फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर यांनी सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावर न्यायमूर्तींनी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे सुरू असलेले बांधकाम आणि येथील अनधिकृत वृक्षतोड तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.
त्यांच्या आदेशात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी माहिती अधिकार कायद्यानुसार मिळालेल्या माहितीवरील नोंदी दाखवल्या आहेत, त्यानुसार उद्यान विभाग व सार्वजनिक माहिती अधिकार अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. निरीक्षण अहवालानुसार अंदाजे ५०० झाडे माती भरावामुळे बाधित झाली असल्याचे नमूद आहे, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी पुढील आदेशापर्यंत झाडे तोडण्यास मनाई केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. राहुल वाळवेकर यांनी काम पाहिले, अशी माहिती मराठा रियासत फौंडेशनचे प्रसाद मोहिते, सौरभ पाेवार यांनी दिली.