Kolhapur: अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रिया, भाविकांना घ्यावे लागणार उत्सवमूर्तीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:05 IST2025-08-11T16:05:43+5:302025-08-11T16:05:56+5:30
अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

Kolhapur: अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रिया, भाविकांना घ्यावे लागणार उत्सवमूर्तीचे दर्शन
कोल्हापूर : श्रावणात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. गेल्या तीन दिवसांत १ लाख ५० हजार ९०२ भाविक अंबाबाईचरणी नतमस्तक झाले. दरम्यान, अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रियेला आज, सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नसल्याने कलश आणि उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांच्या दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केली आहे.
अंबाबाई मंदिर परिसरात देवीचे दर्शन घेण्यासाठी श्रावणात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे पाच वाजल्यापासून भाविक देवीच्या दारात होते. श्रावणातील शुक्रवारी, २१, ०७४, शनिवारी २६,१०५ आणि रविवारी तब्बल १ लाख ३ हजार ७२३ असे तीन दिवसात एकूण १ लाख ५० हजार ९०२ भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले. पहाटेपासूनच महाराष्ट्रासह कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशातील भाविकांनी गर्दी केली होती. या भाविकांमध्ये महिलांची संख्या मोठी होती.
आजपासून घ्या देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन
दरम्यान, श्रावणात देवीचे दर्शन घेण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी आणि आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हणून श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज, सोमवार दि. ११ ऑगस्टपासून मंगळवार दि. १२ ऑगस्टपर्यंत भाविकांना घेता येणार नाही. या कालावधीत भाविकांना श्रींची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आले आहे.
अंबाबाई मूर्तीचे संवर्धन करण्याबाबत गजानन मुनिश्वर, प्रसन्न मालेकर आणि दिलीप देसाई यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोर्ट कमिशन नेमले होते. त्याचा अहवाल आजअखेर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक जिल्हाधिकारी आणि सचिवांनी दिलेला नाही, त्याची माहिती ते का लपवत आहेत, प्रत्येक वेळी सहा महिन्याला मूर्तीचे संवर्धन केले जाते, हे नेमके कोण आहेत, मूर्ती अभ्यासकांची आणि धर्मशास्त्राची माहिती घेतली आहे का? -दिलीप देसाई, कोल्हापूर.