Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही
By समीर देशपांडे | Updated: November 22, 2025 15:51 IST2025-11-22T15:50:32+5:302025-11-22T15:51:45+5:30
Local Body Election: नेते कुठं बसून कशा जोडण्या लावत होते याचा हा वृत्तांत ‘लोकमत’च्या वाचकांसाठी

Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही
समीर देशपांडे
कोल्हापूर : पक्ष, अपक्षांची सरमिसळ झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माघारीच्या अखेरच्या सहा, सात तासात नेते मंडळींचे मोबाइल एंगेज असल्याचे पहायला मिळाले. ‘तू काळजी करू नकोस, माझं तुझ्याकडे लक्ष आहे’, ‘माझ्यावर तुमचा विश्वास हाय ना’, ‘स्वीकृतच्या वेळी बघूया, काळजी करू नको’, ‘ माझं ऐकायचं नसंल तर परत माझी पायरी चढायची नाही’ हे उद्गार हे नेते ज्या ठिकाणी बसून जोडण्या लावत होते, तेथून ऐकू येत होते. जिल्ह्याचे हे नेते कुठं बसून कशा जोडण्या लावत होते याचा हा वृत्तांत ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
मंत्री हसन मुश्रीफ @अंबिका निवास
सकाळी आवरून मुश्रीफ बाहेर पडले ते कोष्टी गल्लीतील भय्या माने यांच्या ‘अंबिका’ निवासस्थानी पोहोचले. वाय. डी. माने अण्णा असल्यापासून मुश्रीफ यांचे या घरात येणे-जाणे. कालपासूनच एक एक जोडणी लावणाऱ्या मुश्रीफ यांनी भय्या यांच्या घरीच बसून चंदगड, कागल, गडहिंग्लज मुरगुडसाठी जोडण्या लावल्या. चंदगडला राजेश पाटील, नंदाताई, गडहिंग्लजला कोअर कमिटी, आजऱ्यात सुधीर देसाई, मुरगुडला राजेखान जमादार यांच्याशी संपर्क साधत मुश्रीफ यांनी काही लढाया सोप्या केल्या. कागलला गरज पडेल त्या ठिकाणी समरजित यांना फोन करून त्यांच्याशीही चर्चा केली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर बालिंग्याला कुंभी बँकेच्या शाखा उद्घाटनालाही पोहोचले. परंतु तेवढा वेळ सोडला तर ३ वाजेपर्यंत मुश्रीफ यांचा फोन सुरूच होता.
मंत्री प्रकाश आबिटकर, @ ‘आनंद निवास’
कागलमध्ये आपले गुरुबंधू संजय मंडलिक यांना मनापासून साथ देणारे प्रकाश आबिटकर सकाळी ७ वाजता कोल्हापुरात दाखल झाले. थेट गारगोटीतील घरी पोहोचले. तातडीने आवरल्यानंतर ‘आनंद निवास’च्या परिसरातील संपर्क कार्यालयात दाखल. आबिटकर यांच्या मतदारसंघात तशी आजरा एकच नगरपंचायत. परंतु पालकमंत्री म्हणून जबाबदारी पडल्याने त्यांनी चंदगडला आमदार शिवाजीराव पाटील, आजऱ्यामध्ये अशोक चराटी, गडहिंग्लजला जनसुराज्य, जदचे पदाधिकारी, मुरगुड आणि कागलसाठी संजय मंडलिक यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला. चंदगडमध्ये भाजपसोबत आघाडी करत तिथे तीन कार्यकर्त्यांना संधी दिली. गडहिंग्लजलाही मुश्रीफ यांच्याविरोधातील आघाडीमध्ये शिंदेसेनेला संधी देण्यात आली. यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत पालकमंत्री सक्रिय राहिले.
खासदार धनंजय महाडिक @ ‘कावळा नाका पंप’
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी खासदार धनंजय महाडिक यांची भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गेले १५ दिवस जोडण्या घालणारे महाडिक सकाळी साडेदहालाच पंपावर आले. भाजपतर्फे १३ ही नगरपालिका नगरपंचायतींबाबत त्यांचे पक्ष आणि आघाडीतील कार्यकर्त्यांंशी बोलणे सुरू होते. जसा फोन येईल तसा उलट फोन संबंधिताला जात होता. चंदगड, गडहिंग्लजला शिंदेसेनेच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजी पाटील, स्वाती कोरी, नाथाजी पाटील यांच्याशी त्यांना संवाद करावा लागला. शिरोळ, जयसिंगपूरसाठी आमदार अशोकराव माने यांच्यापासून राजवर्धन निंबाळकर यांनाही निरोप देणे सुरू होते. ३ नंतरच ते पंपावरून बाहेर पडले.
आमदार विनय कोरे @ वारणा, पन्हाळा
आमदार विनय कोरे हे तीन, चार दिवसांसाठी बाहेरगावी होते. या निवडणुकांच्या दरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना देत त्यांनी फोनवरूनच प्रभावी जोडण्या लावलेल्या. शुक्रवारी माघारीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचे विमान लॅण्ड झाले. तत्पूर्वीच त्यांनी गुरुवारी रात्रीच जनसुराज्यचे युवा प्रदेश अध्यक्ष समित कदम यांना पन्हाळ्यावर पाठवून दिले होते. कोल्हापूर विमानतळावरून ते थेट वारणेला गेले. तिथून दीड वाजता पन्हाळ्यावर आले. एका हॉटेलवरून हालचाली सुरू ठेवल्या आणि अडीचच्या दरम्यान पन्हाळ्यावरून बाहेर पडले.
आमदार सतेज पाटील @ ‘अजिंक्यतारा’
बहुतांशी ठिकाणची कॉंग्रेसची, काही ठिकाणी महाविकास आघाडीची आणि काही ठिकाणी महायुतीशी चर्चा करण्यासाठी आमदार सतेज पाटील शुक्रवारी सकाळीच ‘अजिंक्यतारा’ येथे दाखल झाले. त्यांनी राहुल देसाई, सचिन घोरपडे यांना आजऱ्याला, गोपाळराव पाटील चंदगडमध्ये, राजू लाटकर यांना कुरुंदवाडमध्ये, शिरोळमध्ये गणपतराव पाटील तर हातकणंगलेसाठी राजूबाबा आवळे यांच्या ते थेट संपर्कात होते. ज्या ठिकाणी एक पाय मागे घेऊन पक्ष आणि गटाचे हित दिसत होते. तिथे ते तातडीने निर्णय घेण्यासाठी सांगत होते. सत्तेत नसतानाही आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी संबंधितांशी संपर्क सुरू होता.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर @ जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यात भाजपसह इतर पक्षांना अंगावर घेतलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सकाळीच जयसिंगपूरमधील सहाव्या गल्लीतील संपर्क कार्यालयात ठिय्या मारला होता. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या तीन नगरपालिकांच्या जोडण्या याच ठिकाणी बसून घालताना ते माजी आमदार उल्हास पाटील आणि भाजपमध्ये असलेले; परंतु या निवडणुकीसाठी यड्रावकर यांच्यासोबत असलेले सावकर मादनाईक यांच्याशी त्यांची सातत्याने चर्चा होत होती. चंदगडच्या रिंगणात भाजप शिंदेसेनेच्या विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या उमेदवारांना यड्रावकर यांनीच आपल्या शाहू आघाडीचे एबी फॉर्म दिलेले. परंतु तिथला विषय मंत्री मुश्रीफ यांच्यावर साेपवून यड्रावकर निवांत होते.