कोल्हापूर मनपा निवडणुकीची तयारी; काँग्रेस उद्या मेळावा घेणार.. मालोजीराजेही येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:38 IST2025-07-25T19:38:15+5:302025-07-25T19:38:41+5:30
गेल्या काही दिवसांपासून मालोजीराजे वेगळी भूमिका घेणार अशा चर्चा सुरू

कोल्हापूर मनपा निवडणुकीची तयारी; काँग्रेस उद्या मेळावा घेणार.. मालोजीराजेही येणार!
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसने उद्या शनिवारी महानगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केला आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालोजीराजे वेगळी भूमिका घेणार अशा चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मेळावा होत असल्याने त्याला मालोजीराजेही उपस्थित राहणार असल्याचे शहर काँग्रेसने अधिकृतरीत्या कळवले आहे. त्यामुळे या मेळाव्याला मालोजीराजे येणार का याची उत्सुकता आहे.
काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने प्रत्येक प्रभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीत पुनर्रचना व प्रभागांची संख्या वाढणार असल्याने त्यादृष्टीनेही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.